नांदेड : मद्यधुंद अवस्थेत चारचाकी (एन्डीव्हर) कार चालवणार्याने वेगवेगळ्या सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. वर्दळीचा रस्ता मानल्या जाणार्या भाग्यनगर चौकात हा अपघात घडला. पोलिसांनी वाहनाचा चालक अविनाश शिंदे याला ताब्यात घेतले.
मंगळवार (दि.29) भाग्यनगर चौकात एका गंभीर अपघाताची नोंद झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चारचाकी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका पाठोपाठ दोन ऑटोरिक्षा, एक बुलेट, एक ऑल्टो कार तसेच अन्य तीन वाहनांना धडक दिली.
अचानक घडलेल्या या अपघाताने काही काळ खळबळ उडाली होती. अपघातानंतर मोठा जमाव घटनास्थळी जमला. उपस्थितांनी कारच्या चालकाला चोप दिला. भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जहागिरदार, पोलीस कर्मचारी चापके, लाठकर, शेख सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जमावाला पांगवत जखमी झालेल्यांना तातडीने नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अन्य काही जणांना किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी चालक अविनाश शिंदे याला ताब्यात घेतले असून तो मद्याच्या अंमलाखाली होता, असे सांगण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. नांदेड शहरात ठिकठिकाणी झालेले अतिक्रमणे, रस्त्यांची अर्धवट कामे, वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.