संजीव कुळकर्णी
नांदेड ः शंकरराव चव्हाण यांच्या विरोधातील काँग्रेसच्या तत्कालीन बड्या गटाच्या प्रस्तावाला शेतकरी नेते माधवराव पाटील शेळगावकर यांनी होकार दिला असता, तर 1987 साली नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण विरुद्ध शेळगावकर अशी लढत बघायला मिळाली असती...! प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या एका राजकीय आत्मकथेतून वरील माहिती समोर आली आहे.
वरील निवडणुकीतूनच अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आपल्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून लोकसभेमध्ये प्रवेश केला. पण त्याच्या आधीच्या काही अज्ञात घडामोडी शेळगावकर यांनी उघड केल्या आहेत. त्यांच्या आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यास इतर नेत्यांसह खुद्द अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चळवळ, सहकार क्षेत्रातल्या काही संस्था, ग्राम आणि शैक्षणिक विकास, स्वच्छता तसेच वेगवेगळ्या रचनात्मक कार्यांमध्ये कृतिशील योगदान देणाऱ्या माधवराव पाटील शेळगावकर यांच्या वयाला अलीकडेच 81 वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ आज (दि.22) त्यांचा गौरव सोहळा येथे होत आहे. याच निमित्ताने शेळगावकर यांनी आपली आत्मकथा (‘माझी ग्रामविकासाची शेती’) वाचकांसमोर आणली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन नेत्यांमधील मतभेद आणीबाणीच्या कालखंडात विकोपाला गेले. त्यानंतर त्यांच्यात कधीच दिलजमाई झाली नाही. 1986 साली शंकरराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना नांदेड लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्या रिक्त जागेवर 1987मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसश्रेष्ठींनी शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाण यांचे लाँचिंग केले हेोते.
वरील निवडणूक जाहीर झाल्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या सूचनेवरून शेळगावकर यांनी दादांचे समर्थक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना पोटनिवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला गेला; पण शेतकरी संघटनेची तेव्हाची निवडणूकविषयक भूमिका स्पष्ट करून शेळगावकर यांनी हा प्रस्ताव तेव्हा नाकारला होता. त्यातील महत्त्वाचा तपशील त्यांनी आपल्या आत्मकथेत दिला आहे.
वरील निवडणुकीत शेतकरी संघटनेने नंतर ॲड.प्रकाश आंबेडकर यांना पाठींबा देण्याची भूमिका घेतली होती. पाठींबा दिल्यानंतर संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनी आंबेडकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली, तरी शेळगावकर आणि संघटनेच्या जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आंबेडकरांसाठी अहोरात्र प्रचार केला; पण काँग्रेसने तेव्हा साम-दाम, दंड-भेद या नीतिचा यथेच्छ वापर केला, अठरापगड जातीच्या लोकांमध्ये तोडा आणि फोडा या राजनीतिचा प्रयोग केला.
त्यातून आंबेडकर पराभूत झाले, असे नमूद करून शेळगावकर यांनी आंबेडकरांच्या त्या पराभवावर खंत व्यक्त केली आहे. वरील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द वयाच्या 31व्या वर्षी सुरू झाली. या राजकीय कारकिर्दीस 40 वर्षे होत आलेली असतानाच शेळगावकर यांनी वरील निवडणुकीच्या अनुषंगाने नवी माहिती समोर आणली.
1995 साली शेळगावकर यांनी बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी केली होती. शेतकरी संघटनेच्या अनेक गावच्या शाखांनी त्यांना समर्थन जाहीर केले होते; पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हेच त्या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे शेळगावकर यांची संधी हुकली. त्याचाही तपशील त्यांनी आपल्या आत्मकथेत नोंदविला आहे.
मान्यवरांची उपस्थिती !
माधवराव शेळगावकर यांचा गौरव आणि आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यास वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा समारंभ होणार आहे. जिल्ह्यातील खासदार अशोक चव्हाण यांच्यासह सर्व आमदार, खासदारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी संघटनेतील शंकरअण्णा धोंडगे, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
आपले बालपण, शैक्षणिक जडणघडण, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच सार्वजनिक जीवनाच्या उत्तरार्धात ग्रामस्वच्छता, जलव्यवस्थापन, तंटामुक्त गाव योजना इत्यादी रचनात्मक कार्यातील उल्लेखनीय व महत्त्वाचे प्रसंग त्यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केले आहेत.