किरकोळ वादातून तरुणाचा खून pudhari photo
नांदेड

Nanded Crime : किरकोळ वादातून तरुणाचा खून

नायगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे देवस्थानाच्या यात्रेच्या उत्साहाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात होऊन 29 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घण खून करण्यात आला. गणेश किशनराव वडजे (वय 29) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी नायगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

यात्रेच्या रात्रीच घडला थरार

टेंभुर्णी येथे सध्या देवस्थानाची यात्रा सुरू असल्याने गावात आनंदाचे वातावरण होते. 9 मार्चच्या रात्री गणेश वडजे आपल्या कुटुंबासह जेवण करून यात्रेकडे गेला होता. दरम्यान, गावातील ऑटोचालक पप्पू उर्फ जैनराज सटवा सुताडे (वय 31) याच्याशी गणेशचा काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने रागाच्या भरात गणेशच्या डोक्यावर दगडाने जोरदार प्रहार केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस अधीक्षक शशांक गौड, बिलोलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील (धर्माबाद) आणि पोलीस निरीक्षक मारकड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पप्पू उर्फ जैनराज सटवा सुताडे आणि शाम सटवा सुताडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा (क्र. 0058/2026) दाखल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी गावात यापूर्वीही खुनाच्या अनेक घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या ताज्या खुनामुळे पोलीस प्रशासनासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोमानाळकर करत आहेत.

रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह

रात्रीच्या अंधारात गंभीर जखमी झालेला गणेश रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 10 मार्च रोजी सकाळी ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आली. कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत गणेशचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे यात्रेचा आनंद क्षणात शोकात बदलला असून गावात संतापाची लाट उसळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT