Sowing Pudhari
नांदेड

Nanded News: नायगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस; १४ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण, सोयाबीनला सर्वाधिक पसंती!

नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाला पावसाने वेळेवर आणि समाधानकारक साथ दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded Naigaon taluka kharif sowing

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाला पावसाने वेळेवर आणि समाधानकारक साथ दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे. जून अखेरपासून सुरू झालेल्या पावसाच्या सातत्यपूर्ण हजेरीमुळे तालुक्यातील शेतजमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली असून पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. परिणामी, ३ जुलैअखेर तालुक्यात तब्बल १३ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, त्यात सोयाबीन या नगदी पिकाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे चित्र आहे.

नायगाव तालुक्यात आतापर्यंत २०८.२ मिमी पावसाची नोंद

३ जुलैअखेर १३,७८७ हेक्टरवर खरीप पेरण्या पूर्ण

१०,४३७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड; सर्वाधिक पसंती

बरबडा, कुंटूर, नायगाव व मांजरम मंडळांत पेरणीला वेग

समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांत आशावाद

महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या पावसाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नायगाव तालुक्यात आतापर्यंत २०८.२ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या १०२ टक्क्यांहून अधिक असल्याने खरीप हंगामासाठी ही अत्यंत आशादायक बाब मानली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची रखडलेली कामे झपाट्याने उरकण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्येही पावसाचे प्रमाण समाधानकारक नोंदवले गेले आहे. मांजरम मंडळात सर्वाधिक २२८.८ मिमी, नायगाव मंडळात २२७.८ मिमी, बरबडा मंडळात २०४.० मिमी, नरसी मंडळात १८८.८ मिमी तर कुंटूर मंडळात १४६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्व मंडळांत झालेल्या या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील पेरणीच्या चित्राकडे पाहिले असता, बरबडा मंडळात सर्वाधिक ३,४८९ हेक्टर, कुंटूर मंडळात ३,५२० हेक्टर, मांजरम मंडळात २,३३३ हेक्टर, नायगाव मंडळात २,८८१ हेक्टर तर नरसी मंडळात ५६२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरणीची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण केल्याचे स्पष्ट होत आहे.

पीकनिहाय पाहता, सोयाबीनला सर्वाधिक मागणी असून तालुक्यात १०,४३७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. कमी खर्च, तुलनेने चांगला बाजारभाव, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि नगदी पीक म्हणून असलेले महत्त्व यामुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा सोयाबीनकडे वळल्याचे दिसत आहे. सोयाबीनपाठोपाठ तूर १,३०७ हेक्टर, कापूस १,२६५ हेक्टर, ज्वारी १७० हेक्टर, उडीद २९६ हेक्टर, मुग २५० हेक्टर, इतर खरीप धान्ये ४२ हेक्टर, तीळ १६ हेक्टर आणि मका ३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी आणि कमी जोखमीच्या पिकांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट दिसून येते. सोयाबीन, तूर आणि कापूस या पारंपरिक पिकांवरच मुख्य भर राहिला असून, पावसाची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिली तर पिकांची उगवण आणि वाढही समाधानकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या सूत्रांनुसार, पेरणीनंतरचा पुढील आठवडा पिकांच्या उगवणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार असून, या काळात हलका ते मध्यम पाऊस झाल्यास शेतकऱ्यांच्या आशा अधिक बळावतील.

दरम्यान, काही भागांत सुरुवातीला पावसाचा खंड पडल्याने शेतकरी संभ्रमात होते; मात्र मागील काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. विशेषत: काळ्या जमिनीत ओल टिकून राहिल्याने सोयाबीन आणि तूर पिकांच्या उगवणीला मदत होणार आहे. पावसाचा जोर नियंत्रित राहिला आणि अतिवृष्टीचा फटका बसला नाही, तर नायगाव तालुक्यातील खरीप हंगाम यंदा समाधानकारक ठरण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, मान्सूनच्या आगमनानंतर वकर्णीने साथ दिलेला पाऊस, शेतात पूर्ण वेगाने सुरू असलेल्या पेरण्या आणि सोयाबीनकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल यामुळे नायगाव तालुक्यातील खरीप हंगामाचे चित्र सध्या आश्वासक दिसत आहे. वेळेवर झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या मनातील अनिश्चिततेचे ढग दूर केले असून, आगामी दिवसांत पिकांची उगवण आणि वाढ कशी राहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT