उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूचा भराव आणि सिमेंट काँक्रीट ब्लॉक कोसळला  Pudhari
नांदेड

Nagpur Nanded Highway | नागपूर–नांदेड महामार्गावरील नव्या उड्डाणपुलाचा भराव कोसळला; दोन महिला किरकोळ जखमी

नांदेड शहराजवळील विष्णुपुरी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूचा भराव आणि सिमेंट काँक्रीट ब्लॉक कोसळला

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Nanded Flyover Embankment Collapse

संग्राम मोरे
नांदेड : नागपूर–नांदेड–येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदेड शहराजवळील विष्णुपुरी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूचा भराव आणि सिमेंट काँक्रीट ब्लॉक गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून, महामार्गावरील सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागपूर–नांदेड–येडशी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, मार्गावर विविध ठिकाणी उड्डाणपूल आणि पूल उभारण्यात आले आहेत. विष्णुपुरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाचा एक भाग अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाचे बांधकाम सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच भरावाचा भाग कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून, गुणवत्ता नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर पुलाचा कोसळलेला भाग दोन जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला. तसेच वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखा, जिल्हा पोलिस दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे बचावकार्य व वाहतूक नियोजनाची जबाबदारी सांभाळली.

या घटनेनंतर नव्याने उभारण्यात आलेल्या महामार्गावरील बांधकामांच्या गुणवत्ता नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींची जबाबदारी निश्चित करावी, तसेच महामार्गावरील सुरू असलेल्या सर्व कामांचे स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT