Murder case : ३० वर्षापासून फरार आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या ! file photo
नांदेड

Murder case : ३० वर्षापासून फरार आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या !

एलसीबीची कारवाई, १९९६ मधील खून प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

Murder case: Police arrest accused who had been absconding for 30 years

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. शंकर माधव घोडके (वय ७२, रा. कर्णा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या वृद्ध आरोपीचे नाव आहे.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका जुन्या गुन्ह्यातील तो मुख्य आरोपी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात १९९६ मध्ये आरोपी शंकर घोडके याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. १८/१९९६) दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध 'स्टँडिंग वॉरंट' जारी केले होते.

जिल्ह्यातील प्रलंबित वॉरंट आणि फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना दिले होते. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या पथकाने तपासाची चक्रावली फिरवली. २३ जून रोजी हे पथक शोधमोहिमेवर असताना, गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर ३० वर्षांपासून फरार असलेला आरोपी मुखेड तालुक्यातील कर्णा या त्याच्या मूळ गावी आला आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कर्णा गावात छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले नाव शंकर घोडके असल्याचे कबूल केले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि नागनाथ तुकडे, दारासिंग राठोड, सुनील गटलेवार, ज्ञानोबा कवठेकर, आबाराव पिंगलवाड आणि लहु चाटे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT