रेल्वे मंत्रालयाचे नांदेडसारख्या शहरांकडे दुर्लक्ष  file photo
नांदेड

रेल्वे मंत्रालयाचे नांदेडसारख्या शहरांकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : देशभर रेल्वेचे जाळे विस्तारले जात असले तरी नांदेड किंवा मराठवाड्याकडे रेल्वे मंत्रालयाचे साफ दुर्लक्ष आहे. परभणी ते छत्रपती संभाजीनगर दुहेरीकरण, नांदेड-वर्धा-यवतमाळ नवीन मार्ग बांधणी असो की नांदेड ते मुंबई, पुणे या दोन्ही मार्गावर पुरेशा गाड्या सोडणे, आहेत त्या गाड्यांना वाढीव डब्बे जोडणे असो की गाड्यांच्या वेळा प्रवासीभिमुख करणे असो, कोणतीच मागणी गांभिर्याने घेतली जात नाही, याबाबत नांदेडकर संतप्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरु असून पहिल्या दोन टर्ममध्ये रस्ते व रेल्वेच्या सुविधा वाढवणे, स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसाठी नुतनीकरण करणे, नव्या गाड्या रुळावर आणणे यासारखी विविध कामे केल्याचा दावा केला जातो आहे. वंदे भारत, बुलेट ट्रेनच्या बाबतीत खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे व्हिडीओ, रील्स सोशल मिडियावर शेकडोच्या संख्येने धुमाकूळ घालत आहेत. परंतु देशाच्या ग्रामीण भागात किंबहुना नव्याने विकसीत होऊ पाहणाऱ्या शहरात मात्र रेल्वेविषयक सुविधा पोचल्या की नाहीत, याबाबत केंद्र सरकार वा रेल्वे मंत्रालय गंभीरपणे पाहात नाही, असे दिसते.

नांदेडकरांसाठी रेल्वे विषयक प्रश्नांवर भांडणारे पत्रकार शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, वसंत मैय्या व अन्य अभ्यासू प्रवासी सातत्याने आवाज उठवत आहेत. नुकतेच गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आलेले रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ बिट्ट यांची भेट घेऊन त्यांनी प्रवाशांचे गान्हाण मांडले. परंतु आश्वासनांच्या पलिकडे पदरात काही पडत नाही, असा जुना अनुभव आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरुणकुमार जैन सोमवारी (दि. ३०) नांदेड येथे येत आहेत. सध्या स्वच्छतेचा पंधरवडा सुरु आहे. यानिमित्ताने रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसाठी वरिष्ठ अधिकारी उतरले होते, परंतु गाड्यांमधील घाणीच्या बाबतीत सातत्याने तक्रारी होऊनही त्याकडे दक्षिण मध्य रेल्वेची यंत्रणा लक्ष देत नाही.

परभणी ते मनमाड या अंतरातील दुहेरीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. मनमाडच्या दिशेने छ. संभाजीनगर पर्यंत काम सुरु झाले आहे. परंतु त्याचवेळी परभणी येथून छ. संभाजीनगर पर्यंतच्या कामाला केव्हा मुहूर्त लागणार, हा प्रश्न आहे. नदिड वर्धा-यवतमाळ या मार्गासाठी भूसंदापनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते, मग प्रत्यक्ष कामाला सुरु करण्यास काय अडचण आहे, हे कळायला मार्ग नाही. नांदेड- विदर या मार्गाला सुद्धा गती देण्याची गरज आहे.

नांदेड-पुणे आणि नांदेड-मुंबई या मार्गावर आणखी एक-एक गाडी सोडण्याची आवश्यकता आहे. दोन्ही मार्गावर सकाळच्या वेळी गाडी नाही. शिवाय नांदेड-पुणे ही दुपारी ३.३० वाजता सुटणारी गाडी प्रवाशांच्या सोयीची नाही. ती दोन घंटे विलंबाने सोडावी, तसेच नांदेड-पनवेल ही गाडी सुद्धा रात्री ८ किंवा ८.३० वाजता सोडल्यास अधिक सोयीचे होईल.

नांदेड ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या तपोवन, नंदीग्राम व राजाराणी या तिन्ही गाड्यांना दोन जनरल, एक वातानुकुलित व एक चेअरकार जोडण्याची नितांत गरज आहे. या बाबतीत रेल्वेचे सर व्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी संवेदनशीलतेने विचार करुन नदिडकरांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी होत आहे.

नांदेड-विशाखापटनमला पीठापूरम येथे थांब्याची गरज

नांदेडहून विशाखापटनम येथे जी जलदगती गाडी जाते, ती पीठापुरम येथे थांबत नाही. खरे म्हणजे या गाडीने जे मराठी प्रवासी प्रवास करतात, ते पीठापुरम येथे प्रभू दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी जाणारे असतात. परंतु पीठापुरम येथे गाडी थांबत नसल्याने त्यांची फार गैरसोय होते. राजमुंद्री येथे उतरुन त्यांना अन्य वाहनाने जावे लागते, ही समस्या चुटकीसरशी सुटणारी असूनही दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, यावरुनही लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT