Minister Shivendrasinhraje Bhosale's visit to Nanded district
विशेष प्रतिनिधी
नांदेड शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम बांधकाम मंत्र्याची, त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्या धडाकेबाज कामांची 'गौरवगाथा' सांगणाऱ्या नांदेड बांधकाम विभागासह शेजारच्या जिल्ह्यांतील अन्य विभागांनाही गेल्या तीन महिन्यांत जुन्या किंवा नव्या कामांसाठी शासकीय निधी आलेला नसल्याची माहिती या खात्याच्या मंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यात समोर आली आहे.
मंत्री शिवेन्द्रसिंहराजे भोसले यांचा नांदेड जिल्हा दौरा बुधवारी दुपारनंतर येथे प्राप्त झाला. एक नव्हे तर दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा असून त्यात शुक्रवारी होणारी आढावा बैठक वगळता एकही शासकीय कार्यक्रम नसल्याचे पाहून राजकीय निरीक्षक बुचकाळ्यात पडले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता, या खात्याच्या सर्वच विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
नांदेड आणि शेजारच्या दोन जिल्ह्यांतील कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके बांधकाम खात्याकडे प्रलंबित असून गेल्या आठवड्यातच कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित देयकांसंदर्भात निवेदन सादर केले होते. या संघटनेने अन्य काही मागण्याही केल्या आहेत. प्रलंबित देयके व अन्य मागण्यांसाठी या संघटनेचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्र्यांना शुक्रवारी भेटणार आहे. दरम्यान कंत्राटदारांची प्रलंबित देयके दिवाळीपर्यंत अदा केली जातील, असे मंत्री भोसले यांनी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले.