महिलांच्या आरोग्यासाठी मेनोपॉज क्लिनिकचा उपक्रम file photo
नांदेड

Nanded News : महिलांच्या आरोग्यासाठी मेनोपॉज क्लिनिकचा उपक्रम

जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा पुढाकार : प्रत्येक बुधवारी आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Menopause clinic initiative for women's health

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या सूचनेनुसार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात महिलांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल लक्षात घेऊन, जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक (रजोनिवृत्ती क्लिनिक) सुरू करण्यात आले आहेत.

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आता दर बुधवारी नियमितपणे राबविला जात आहे. नुकत्याच झालेल्या २८ जानेवारी रोजीच्या क्लिनिकमध्ये जिल्ह्यातील विविध २० केंद्रांवर महिलांची तपासणी करण्यात आली.

उपक्रमाची ही आहेत प्रमुख वैशिष्ट्ये

१) प्रत्येक बुधवारी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये विशेष मेनोपॉज ओपीडी भरवण्यात येणार.

२) स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि वैद्यकीय चाचण्यांची सुविधा. ३) रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना होणारा मानसिक त्रास आणि हार्मोनल बदलांवर मात करण्यासाठी विशेष समुपदेशन.

४) महिलांना या वयात आवश्यक

असलेल्या संतुलित आहाराबद्दल आणि जीवनशैलीतील बदलांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.

आतापर्यंत १३२ महिलांची तपासणी

जिल्ह्यातील एकूण २० आरोग्य संस्थांमधून या उपक्रमात देगलूर (३३), भोकर (१८), मुदखेड (१२) आणि मुखेड (११) एकूण १३२ महिलांची तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त माता-भगिनींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, दर बुधवारी जवळच्या शासकीय रुग्णालयातील या मेनोपॉज क्लिनिकचा लाभ घ्यावा,
डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT