नांदेड ः शहरातील बाफना टी पॉइंटजवळ शनिवारी पाहटेच्या सुमारास एका अरमान डेंटिंग पेंटिंग कारच्या दुकानाला भिषण आग लागली. या आगीत दुकानातील तीन ते चार कार आगीत भस्मसात झाले तर इतर चार ते पाच कारला थोडी झळ पोहंचली. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने आग इतरत्र पसरली नाही. आणि मोठे नुकसानही टळले.
उन्हाळा सुरु झाला की आगीच्या घटनेत वाढ होते. शुक्रवारी दि. 6 रोजी दुकान बंद करुन अरमान डेंटिग पेंटिंग कारचे मालक घरी गेले. त्यानंतर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बाफना टि पॉईंट कडून जाणा-या पोलीस व्हॅनला दुकानाला आग लागल्याचे दिसले. पोलीसांनी अग्निशमन पथकाला पाचारण केले.
त्यावेळी अग्निशमन अधिकारी के एस दासरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी आगीने रुद्र रुप घेतले होते. आग आजूबाजूच्या दुकांनाकडे जाऊन इतर दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडत होती. मात्र, अग्निशमन दलाने तातडीने आग विझवून मोठे नुकसान टाळले.
या आगीत अरमान डेंटिंग पेंटिंग कार दुकानातील तीन ते चार पुर्णतः जळाल्या तर इतर चार ते पाच कारचे थोड्या बहुत प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळावर पोलीसांनी येऊन पंचनामा केला असून, प्राथमिक अंदाजानुसार चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाला आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा अद्याप कांही सुगावा लागला नाही. आग ही शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
या प्रकरणात पुढील तपास पोलीस करीत आहेत. अग्निशमन अधिकारी के एस दासरे, उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे श्री सावळे, श्री लांडगे, श्री नरवाडे, श्री शिंदे वाहन चालक श्री टारपे यांनी आग विझविण्यात महत्वाची भुमिका बजावली.