Massive fire breaks out in a railway coach parked at Nanded railway station; Major accident averted
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : येथील हुजूरसाहेब रेल्वेस्थानकावरील स्टेबल लाईनवर (साईड ट्रॅक) उभ्या असलेल्या एका रिकाम्या रेल्वे - कोचला (डब्याला) आज, गुरुवारी (दि.. २१) सकाळी अचानक भीषण आग लागली. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे रेल्-वेस्थानक परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि प्रवाशांची धावपळ झाली. मात्र, सुदैवाने सदर कोच पूर्णपणे रिकामा असल्याने एक मोठी दुर्घटना टळली.
शिख धर्मीयांची दक्षिण काशी - म्हणून ओळख असलेल्या नांदेडच्या हुजूरसाहेब रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. - वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाची व्याप्ती आणि सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. स्थानकावरील दैनंदिन रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य प्लॅटफॉर्मच्या बाजूला अतिरिक्त किंवा दुरुस्तीसाठीच्या कोच पार्क करण्यासाठी स्टेबल लाईनची व्यवस्था आहे. या ट्रॅकवर उभ्या असलेल्या एका रिकाम्या कोचमधून गुरुवारी सकाळी अचानक धूर निघू लागला उन्हाच्या कडाक्यामुळे काही वेळातच आगीने संपूर्ण डब्याला वेढले.
तपास सुरू
हा रेल्वे कोच पूर्णपणे रिकामा असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या कोचला अचानक आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किट की इतर काही कारण, याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.
प्रशासनाची तत्परता, आग आटोक्यात
रेल्वे स्थानकाजवळच आगीचे लोट आणि धूर दिसू लागल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलली. रेल्वेचे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यंत्रणांच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. हा कोच बाजूला असल्याने मुख्य प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.