Martala school becomes an ideal image of Kerala pattern
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण विचारांची गरज लक्षात घेऊन लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. नो बॅकबेंचर्स ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरवली असून, या शाळेने आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून एक आदर्श उभारला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक रवी डगे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. चौथी, पाचवी व सातवी या वर्गामध्ये ही नवी बैठक व्यवस्था अमलात आणली गेली आहे. भारतात गाजलेल्या मल्याळम चित्रपट स्थानार्थी श्रीकुट्टन मधून प्रेरणा घेऊन या उपक्रमाचा विचार केला गेला आहे. या बैठकीच्या नव्या पद्धतीनुसार वर्गात कुणालाही बॅकबेंचर ठरवले जात नाही. सर्व विद्याध्यर्थ्यांना समप्रमाणात जागा देत एकसमान आसनव्यवस्था तयार केली गेली आहे.
बाके एक विशिष्ट पद्धतीने लावण्याऐवजी विद्यार्थ्यांना एकत्रित, समांतर आणि एकसमान बैठकीची संधी दिली जाते. यामुळे कोणतीही भौगोलिक किंवा मानसिक पातळीवरची शिक्षणातील दरी कमी होण्यास मदत होते. आगामी काळात शाळेतील इतर सर्व वर्गामध्ये ही बैठक रचना राबवण्यात येणार आहे. शिक्षणात संधीची समता ही मूलभूत गरज असून, प्रत्येक विद्यार्थी केंद्रस्थानी यावा यासाठी हा प्रयत्न आहे, असे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी सांगितले. या उपक्रमाचे माध्यमिक शिक्षण अधिकारी माधव सलगर यांनीही कौतुक केले आहे.
नो बॅकबेंचर्स ही संकल्पना म्हणजे केवळ बैठक व्यवस्था बदलण्याचा उपक्रम नसून, तो शिक्षणामधील समतेचा, सहभागाचा व विद्यार्थ्यांच्या आत्मभानाचा एक मजबूत टप्पा आहे. शाळा व शिक्षक जर असे नवनवीन प्रयोग करून शिक्षणात सकारात्मकता आणत असतील, तर ग्रामीण भारतातील शिक्षणाचे चित्र निश्चितच उजळू शकते.
शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करणे अधिक सोपे होते. विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग वाढला असून ते शिक्षणात अधिक सक्रिय झाले आहेत. शिक्षणातील समानता, न्याय आणि सहभाग या तत्वांना प्रोत्साहन मिळाले आहे. बॅकबेंचर्स या संज्ञेमुळे निर्माण होणारी नकारात्मक मानसिकता पूर्णपणे नष्ट झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आपणही काहीतरी करू शकतो ही भावना रुजवली जात आहे.
आजच्या बदलत्या शिक्षणप्रक्रियेत अशा प्रकारचे प्रयोग अत्यंत गरजेचे आहेत. यामुळे शिक्षणात समानता येईल आणि गळती रोखली जाईल. रवी ढगे हे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात सातत्य ठेवणारे शिक्षक असून, त्यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय सिंगापूर अभ्यास दौरा यशस्विरीत्या पूर्ण केला आहे. त्यांनी मिळवलेला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आता त्यांच्या वर्गखोल्यांमध्ये प्रत्यक्ष उतरवला जात आहे.माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)