

प्रशांत भागवत
उमरखेड: राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने १ जुलै २०२४ पासून विदेशी दारूच्या दरात केलेल्या लक्षणीय वाढीमुळे मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. सरासरी ८० ते १५० रुपयांनी दर वाढल्याने अनेक मद्यपींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, तर दुसरीकडे ग्राहक घटल्याने परवानाधारक विक्रेतेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या दरवाढीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसला आहे. पूर्वी १८० मि.ली. ची बाटली जी १९० रुपयांना मिळत होती, तिची किंमत आता थेट २५० ते ३४० रुपयांवर पोहोचली आहे. बार आणि रेस्टॉरंटमधील दरात तर यापेक्षाही मोठी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे, पूर्वी रोज मद्यपान करणारे ग्राहक आता एक-दोन दिवसाआड खरेदी करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
सर्वाधिक खप असलेल्या आर.एस. (रॉयल स्टॅग) आणि मॅकडॉवेलसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. याचा थेट परिणाम परवानाधारक दारू विक्रेत्यांच्या व्यवसायावर झाला आहे. ग्राहक संख्या घटल्याने विक्रेते चिंतेत आहेत. काही विक्रेते जुन्या दरातील साठा (ओल्ड स्टॉक) नवीन वाढीव दराने विकत असल्याने ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील अनेक हॉटेल्स आणि धाब्यांवर परवाना नसतानाही देशी-विदेशी दारूची छुप्या पद्धतीने विक्री सुरू झाली आहे. या ठिकाणी वाढीव दरावर अतिरिक्त पैसे आकारून दुप्पट नफा कमावला जात असल्याची चर्चा आहे.तर दुसरीकडे दर वाढल्याने कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या बनावट आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या दारूचा शिरकाव बाजारात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी पुसद तालुक्यात असा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने अधिक सतर्क राहून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.