विशेष प्रतिनिधी
नांदेड : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाची सज्जता होत असतानाच मतदार यादीतील असंख्य घोळ समोर येत आहेत. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, त्यांच्या आमदार कन्या तसेच अनेक लोकप्रतिनिधींसह शेकडो कार्यकर्त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट झाली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
या निवडणुकीसाठी नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ११८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवरील नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांना गुरुवारी मतदान प्रक्रियेच्या साहित्यासह नियुक्तीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले. अंतिम मतदार यादीत ३७ हजारांहून अधिक पदवीधर मतदारांची नावे आहेत; पण मागील काही महिन्यांत ज्या पात्र मतदारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दाखल केले, तरी त्यातील हजारो नावे मतदार यादीत नसल्याची तक्रार सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांनीच केली आहे.
भाजपाच्या एका जबाबदार पदाधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे नेते खा.अशोक चव्हाण तसेच त्यांच्या दोन्ही कन्यांनी नाव नोंदणी केली, तरी मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट झाली नाहीत. माजी मंत्री डॉ.माधव किन्हाळकर व लेखिका असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.वृषाली यांचेही नाव मतदार यादीत दिसत नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मराठवाड्यातील अनेक आमदारांची नावे यादीमध्ये नाहीत, असे दिसून आले.
विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी नांदेडमध्ये मोठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याच यंत्रणेतील एक प्रमुख प्रा.डी.बी.जांभरुणकर यांच्याकडे मतदार यादीसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी येत आहेत. त्यानुसार सुमारे ४०० ते ५०० मतदारांची नावे मतदार यादीत आली नसल्याची नोंद त्यांच्याकडे झाली. नांदेडच्या काही मतदारांची नावे बीड जिल्ह्यात गेली असल्याची बाबही निदर्शनास आली. नांदेडमध्ये आपल्याच कुटुंबातील चार सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर गेल्याचा अनुभव जांभरुणकरांनाच आला. शहरी भागातील मतदारांची नावे ग्रामीण भागात गेल्याचे प्रकार दिसून आले.
भाजपाचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या नावाची नोंद ऑनलाइन केली होती. त्यांचे नाव मतदार यादीत आले; पण त्यांच्या पत्नी मृणाल यांचे नाव यादीमध्ये आलेले नाही. भाजपा पदाधिकार्यांनी काही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी केली होती; परंतु त्यातील अनेकांची नावे मतदार यादीत आली नाहीत.