Marathwada flood 
नांदेड

Marathwada flood: शेती पाण्याखाली, सरकारकडून दुर्लक्ष; पूर पीडित शेतकऱ्यांचा सामुदायिक जलसमाधीचा प्रयत्न

Nanded latest news: पंचनामे झाले, पण मदत कधी असा सवाल करत मुलाबाळांसह नुकसानग्रस्त आठ तास पाण्यातच

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र येरावार

उमरी: धर्माबाद तालुक्यातील रोषनगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या मुलाबाळांसह एकजूट होऊन शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी रविवारी (दि.२८ सप्टें.) सकाळी सामुदायिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीनशे लोकांनी आठ तास पाण्यातच राहून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

गोदावरी नदीचे बॅकवॉटर गावात घुसले

तालुक्यात पाचवेळा अतिवृष्टी झाली. गोदावरी नदीचे बॅक वॉटर गावात घुसले. त्यामुळे संपूर्ण जमिनी पाण्याखाली आल्या. पंचनामे झाले, मात्र अजूनही मदत मिळाली नाही. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. आसमानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनालाही जाग येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात संपूर्ण गाव संतप्त झाला आणि रविवारी सकाळी अक्षरशः ग्रामस्थांनी गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमध्ये उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

जोपर्यंत दखल घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच; ग्रामस्थांचा पवित्रा

सरकारविरोधी काही संतप्त ग्रामस्थ खोलवर पाण्यात गेले होते. जोपर्यंत प्रशासन दखल घेणार नाही, तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असा पविञा त्यांनी घेतला होता. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आठ तास पाण्यातच काढले. आता तरी सरकारला जाग येईल काय ? अजूनही सरकारचे दुर्लक्ष झाले तर आम्ही प्राणाचा त्याग करू असा पवित्रा संतप्त गावकऱ्यांनी घेतला होता.

बॅकवॉटरमुळे 80 टक्के शेती पाण्याखाली

श्रीरामसागर (पोचमपाड) प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील शेती संकटात सापडली असून शासनाकडून मदतीची कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील सुमारे 80 टक्के शेती पाण्याखाली गेली आहे. शेती हाच एकमेव उपजीविकेचा मार्ग असल्याने या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला आहे.

आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा...जलसमाधी घेऊ

दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते, घरात पाणी शिरते, रस्ते बंद होतात आणि लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित होतात. मात्र या समस्येकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून मदतीची मागणी करत आहोत. आता सहनशक्ती संपली आहे. संपूर्ण गाव सामूहिक जलसमाधी घेईल. असे संतप्त गावातील लोकांनी सांगितले आहे. ग्रामस्थांनी आम्हाला अन्न धान्याची सोय करावी व महाराष्ट्र शासन लवकरात लवकर उमरी धर्माबाद नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, 100% पीक विमा मंजूर करावा, शंभर टक्के कर्जमाफी करावी, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान तत्काळ द्यावे. अन्यथा संपूर्ण गावकरी जलसमाधी घेऊ असा पवित्रा घेतला आहे.

प्रशासनाकडून दखल लवकरच प्रश्न सोडवम्याचे आश्वासन

या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. भगवान मनुरकर यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याशी संपर्क साधला. थेट घटनास्थळावरून व्हिडिओ कॉल करून परिस्थिती दाखवली. तेव्हा प्रशासनाच्यावतीने याबाबतीत मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याच संदर्भात लवकरच मुंबई येथे महत्त्वाची बैठक लावून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा ज्वलंत प्रश्न सोडविणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याचे डॉ. भगवान मनुरकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसापासून उद्भवलेल्या या गंभीर समस्येबाबत राज्य सरकारने तेलंगणा सरकारशी केलेल्या संपर्कातून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही मनूरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT