'Majpa' enters Nanded to support the BJP!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : धर्माबाद नगरपरिषदेमध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करून सत्तेत आलेल्या मराठवाडा जनहित पार्टी (मजपा) ची नांदेड मनपा निवडणुकीमध्ये एन्ट्री होत असून भाजपाला वाव नसलेल्या काही जागा मजपाला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपाची शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता मावळल्याचा अर्थही काढला जात आहे.
नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाने ऐनवेळी बिलोलीमध्ये माघार घेतल्यानंतर तेथे मजपाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे १४ उमेदवार निवडून आले. याच पार्टीन धर्माबाद नगर परिषदेत भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचाही धुव्वा उडवत तेथे पदार्पणातच सत्ता मिळविली. भोकर नगर परिषदेतही या पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले असून पुढील काळात भाजपाशी सहयोग करण्याची भूमिका या पार्टीच्या प्रमुखाने नंतर जाहीर केली.
मजपाच्या वादग्रस्त प्रमुखाविरुद्ध भाजपा आमदार राजेश पवार यांनी पक्षनेत्यांकडे तक्रार केली; पण या प्रमुखाला भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी पक्षाच्या एका नेत्यासह मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या भेटीस नेले होते. या भेटीत मुख्यमंत्र्यांना मजपाच्या या प्रमुखाने पुष्पगुच्छाही दिला. त्यानंतर या पार्टनि आता नांदेड मनपा निवडणुकीत भाजपाच्या मदतीसाठी धाव घेतल्याचे समोर येत आहे.
नांदेड मनपाच्या गणेशनगर आणि शिवाजीनगर या प्रभागांच्यामध्ये असलेल्या क्रमांकाच्या ७मुस्लीम मागासवर्गीयबहूल प्रभागामध्ये भाजपा किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांना आपले उमेदवार निवडून आणण्यास वाव नसल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रभागातील चारही जागांवर मजपाच्या उमेदवारांना उभे केले जात असल्याची माहिती समोर आली. भाजपात असलेल्या एका माजी महापौरांनी या माहितीला दुजोराही दिला. जेथे भाजपाला वाव नाही, अशा जागांवर मजपाचे काही उमेदवार 'कपबशी' या एकाच चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले जाणार आहेत, असे सांगण्यात आले. मजपाच्या वरील नेत्याचा वावर भाजपातील एका प्रभावशाली गटासोबत दिसून येत आहे.
उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात चर्चा
नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीसंदर्भात भाजपाचे राज्य निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सायंकाळी नांदेडहून गेलेल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा आणि विचारविनिमय केला. त्यानंतर नांदेडहून गेलेले नेते पहाटेच नांदेडला परतले; पण छत्रपती संभाजीनगर येथील वरील चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. भाजपाचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांची शनिवारी दुपारी दीर्घकाळ बैठक झाली. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रभागांतील उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.