Maintain blood pressure control adopting moderate lifestyle
नांदेड पुढारी वृत्तसेवा : उच्च रक्तदाब हा शरीरांतर्गत अवयवावर छुपा हल्ला करणारा शत्रू आहे. नियमित तपासणी, आयुष्यभर न सुटणारी गोळी व संयमित जीवनशैली याद्वारे रक्तदाब नियंत्रित ठेवणे शक्य असल्याचा मंत्र हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अरुण मान्त्रीकर यांनी दिला आहे.
रयत रुग्णालयाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त 'उच्च रक्तदाबः प्रतिबंध, निदान उपचार' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी रयत आरोग्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे सचिव डॉ. एम. एस. पाटील, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. संतोष दूरुगकर व मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. देवदत्त देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मान्नीकर यांनी उच्च रक्तदाबामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची सोप्या भाषेत उकल करीत रुग्णांनी घ्यावयाच्या काळजी याविषयी मार्गदर्शन केले. संतुलित आहार, व्यायाम व योगासनाचे महत्त्व विशद करत त्यांनी दैनंदिन जीवनातील तणाव आटोक्यात ठेवण्यासाठी अपेक्षांचे ओझे कमी करून प्रत्येकाने आवडत्या छंदाची जोपासना करण्यावर भर द्यावा, असाही मंत्र दिला आहे. डॉ. राधा राठी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. एस. पाटील यांनी आभार मानले.
प्रारंभी ज्येष्ठ गायक संजय जोशी यांनी गीत सादर केले. रयत आरोग्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. खुरसाळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या महागड्या वैद्यकसेवेला पर्याय उभारण्यासाठी 'रयत'च्या माध्यमातून समाजाच्या सहकार्याच्या बळावर माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रयतमधील गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. संतोष दुरुगकर यांनी उच्च रक्तदाब व मधुमेहामुळे किडनीवर होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव करून उपाययोजनाविषयी माहिती दिली. रुग्णांनी स्वयं उपचार तसेच वेदन-ाशामकाचा अतिरिक्त वापर टाळण्याचे त्यांनी आवाहन केले. मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. देवदत्त देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.