Mahur Police Succeed in Preventing Child Marriage
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : माहूर शहराच्या दक्षिणेस १० किमी अंतरावर असलेल्या दत्त मांजरी या गावात बालविवाह होत आहे. अशी माहिती माहर पोलिसांना मिळताच सपोनि शरद घोडके यांनी विवाहस्थळ गाठून नियोजित बालवधू व वर यांच्या आई वडिलांची कायद्याचा हवाला देऊन समज काढली, आणि सदरचा विवाह थांबवून नियोजित वधू सज्ञान होताच तिचा विवाह करण्यात येईल असे त्यांचेकडून हमीपत्र घेतले.
माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथे रविवार दि. ३ मे रोजी स. ११-४५ वाजता बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच पो. नि. देविदास चोपडे यांचे मार्गदर्शनात सपोनि शरद घोडके व पोहेकॉ. गजानन चौधरी यांनी विवाहस्थळ गाठून नियोजित बालवधू व वर यांच्या आई वडिलांना बालवधूचे आधारकार्ड व इतर शैक्षणिक पुराव्याचा दाखला देऊन तीने १८ वर्षे पूर्ण केले नसल्यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन करुन त्यांना समज दिली. त्यानुसार वधू व वराच्या आई वडिलांनी विवाह थांबविण्यास संमती दर्शविली.
त्यानंतर सपोनि शरद घोडके यांनी सरपंच सुलोचना पवार, ग्रामपंचायत अधिकारी पी. वी. कासदेकर, पोलीस पाटील रितेश केंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष नुरसिंग चव्हाण, तांदळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश वानखेडे, अंगणवाडी सेविका वनिता गजलवार व ग्रामपंचायत सेवक विलास राठोड यांचे समक्ष वर व बाल वधू यांचे आई वडिलांकडून बालवधू सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र घेतले. वेळीच हस्तक्षेप करुन होऊ घातलेला बालविवाह रोखल्याबद्दल माहूर पोलिसांच्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे