Child Marriage of a Minor Girl Prevented in Kaij Taluka
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात जोला येथे एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तो बालविवाह रोखला. या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि ज्या मुलासोबत त्या मुलीचे लग्न उरकण्याचा डाव होता त्या मुलाच्या आई-वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील जोला येथील सौ सुनीता व भगवान करंजकर या दांपत्याची १७ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी प्रतिमा करंजकर हिचा पिंपळगाव ता. केज येथील सौ. कौशल्या व महादेव जाधव यांचा मुलगा श्रीकांत याच्याशी दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजता जोला येथील शेतातील घरासमोर विवाह करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसाना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक रेडेकर, श्रीमती जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल येवले, पोलिस कॉन्स्टेबल जाधव यांनी छापा टाकून त्यांचा बालविवाहाचा प्रयत्न उधळून लावला. तसेच त्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला असता तिने दि. २६ एप्रिल रोजी तिचा साखरपुडा झाल्याचे सांगितले.
दरम्यान केज पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती लटपटे यांच्या आदेशाने अंगणवाडी सेविका सविता विष्णु सारुक यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे आई- वडील सुनिता भगवान करंजकर आणि भगवान शिवाजी करंजकर, भावी नवरदेव श्रीकांत महादेव जाधव व त्याचे आई-वडील कौशल्या महादेव जाधव आणि महादेव नरहरी जाधव या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.