विधान परिषद निवडणूक : नांदेडमध्ये महायुतीतील बंडखोरी टळणार! pudhari photo
नांदेड

Nanded MLC election | विधान परिषद निवडणूक : नांदेडमध्ये महायुतीतील बंडखोरी टळणार!

जागा भाजपाला सुटली असून या पक्षाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात येत्या 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महायुतीतील तीन पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी एक संयुक्त पत्रक जारी केल्यानंतर नांदेड मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही, हे जवळजवळ स्पष्ट झाले. ही जागा भाजपाला सुटली असून या पक्षाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी हा उमेदवार निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगण्यात आले.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत नांदेडमध्ये आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये महायुतीतील राष्ट्रवादीतर्फे प्रवीण पाटील चिखलीकर, महाविकास आघाडीतील कृष्णा नागेश पाटील, माजी आमदार माधवराव पवार जवळगावकर, काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर, वंचितचे प्रशांत इंगोले, उबाठा शिवसेनेचे ज्योतिबा खराटे यांचा समावेश होता. अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवारी दुपारी 3 वाजता संपणार असून राजूरकरांच्या विरोधात रिंगणात उतरलेले बहुसंख्य उमेदवार माघार घेतील, असा रागरंग दिसत आहे.

प्रवीण चिखलीकर हे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र असून त्यांनी पक्षातर्फे एक व एक अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांचा अर्ज अपक्ष म्हणूनच गणला गेला. अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यापूर्वी आ.चिखलीकर येथून मुंबईला गेले. तेथे त्यांनी राष्ट्रवादी तसेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जाते. ते गुरुवारी सकाळी येथे परत येत आहेत. प्रवीण पाटील हे शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतील, असा अंदाज येथे वर्तविला जात आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आ.चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवार उभा करण्याची गर्जना केली होती. भाजपाविरोधात एकच सशक्त उमेदवार असावा, यादृष्टीनेही चाचपणी व चर्चा सुरू होती; पण चिखलीकर यांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आवश्यक त्या सूचना दिल्यामुळे महायुतीत बंडखोरी होणार नाही, हे आजच स्पष्ट झाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधून बंडखोरीसंदर्भात अंदाज घेतला होता.

निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने भाजपाचे स्थानिक नेते खा.अशोक चव्हाण हे गेल्या आठवड्यापासून सक्रिय झाले. गेल्या दोन दिवसांत त्यांनीच काही महत्त्वाच्या भेटीगाठी केल्या. अपक्ष उभे असलेले माजी आमदार माधवराव पवार यांनीही त्यांनी भेट घेतली. आ.बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमास ते आवर्जून हजर राहिले. अशा छोट्याछोट्या बाबींमधून चव्हाण आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी वातावरण निर्मिती करताना दिसले. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी व इतर काहींची एक बैठक बुधवारी झाली. या बैठकीतील चर्चेचा तपशील समोर आला नसला, तरी कृष्णा पाटील, माधवराव पवार, रामदास पाटील या तिघांमधून एकच उमेदवार अंतिम करावा असे प्रयत्न जारी असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसचीही बैठक

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पूर्वसंध्येला खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाग्यनगर येथील कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. काँग्रेसतर्फे रामदास पाटील आणि माधवराव पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे पक्षाची अंतिम भूमिका निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजले. रामदास पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला असल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार माधवराव पवार गुरुवारी आपला अर्ज मागे घेणार हे निश्चित मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT