लोकसंख्येच्या तुलनेत 3.43 टक्के कुटुंबांची झाली स्व-गणना! pudhari photo
नांदेड

Nanded Self Census : लोकसंख्येच्या तुलनेत 3.43 टक्के कुटुंबांची झाली स्व-गणना!

रील्स, आयपीएलमध्ये गुंग युवकांना राष्ट्र कार्यात सहभागाचा विसर

पुढारी वृत्तसेवा

महेश राजे

नांदेड ः अंदाजे 40 लाख लोकसंख्येच्या नांदेड जिल्ह्यात मागील 15 दिवसांत केवळ 27 हजार 461 कुटुंबांची स्वगणना झाली आहे. एका कुटुंबात 5 सदस्य गृहीत धरल्यास हे प्रमाण केवळ 3.43 टक्के आहे. एरवी अँपल, अँड्रॉईड फोन, स्मार्ट टीव्ही मध्ये हरवलेल्या तरुणाईला राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आयते व्यासपीठ मिळून सुद्धा ते पार पाडण्याचे भान राहिले नाही, असे चित्र आहे. शनिवारपासून (दि. 16 मे) प्रत्यक्ष गृहभेटींना सुरूवात झाली आहे.

दि. 1 मे महाराष्ट्र दिनापासून जनगणनेला सुरूवात झाली आहे. त्याचा पहिला टप्पा स्वगणना करण्याचा होता. तो शुक्रवारी पार पडला. या अंतर्गत मागील 15 दिवसांत 27 हजार 461 नागरिकांनी आपल्या कुटुंबाची स्वगणना केली आहे. ही संख्या लक्षावधी युजर्सच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे.

2001 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाख 76 हजार 259 होती. तर 2011 च्या जनगणनेनुसार 36 लाख 61 हजार 292 लोकं नांदेड जिल्ह्यात वास्तव्य करून होते. 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते ; परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही. तरी देखील झाली असती तर अंदाजे लोकसंख्या 40 लाख 20 हजार एवढी असती. त्यात आता आणखी पाच वर्षांची भर पडणार आहे.

नांदेड जिल्ह्यात साक्षरतेचा दर सुमारे 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तरुणांची संख्या जास्त असून मतदार नोंदणीवरुन ती स्पष्ट होते. 28 लक्ष 24 हजार मतदारांमध्ये 50 टक्के प्रमाण चाळीशीच्या आतील मतदारांचे आहे. यानुसार एकूण लोकसंख्येत 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांची संख्या गृहित धरल्यास सुमारे 70 हजार लोकसंख्या तरुण आहे.

अर्थात ही सर्व मंडळी संगणक साक्षर असून अर्ध्याहून अधिक लोकांकडे स्मार्टफोन आहेत. तरी देखील या मंडळींनी स्व-गणनेला प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. खरे म्हणजे स्व-गणनेची संगणकीय पद्धत अतिशय सोपी व विनासायास होती. जेमतेम 5 ते 10 मिनिटात स्व-गणना करता आलेली आहे. अतिशय मोजके व सुटसुटीत प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या खाली पर्याय होते, त्या पर्यायांना फक्त टीकमार्क करणे अपेक्षित होते.

वेबसाईट उघडल्यानंतर जिल्ह्याचा नकाशा अपलोड केलेला असून विचारलेल्या प्रश्नानुसार घराचा पत्ता लिहिल्यानंतर नकाशात आपले घर शोधणे अतिशय सोपे होते. या प्रमाणे अधिकाधिक लोकांनी स्व-गणना केली असती तर प्रगणकाचे काम तर सोपे झालेच असते ; परंतु कर्त्या पुरुषाच्या माघारी घरी आलेल्या प्रगणकाला सुद्धा कमी वेळात आपले काम करणे सोपे झाले असते.

प्रथमच डिजिटल स्वरुपात होणाऱ्या या स्व-गणनेचा आवश्यक तो प्रचार व प्रसार सुद्धा होऊ शकला नाही. जिल्हाधिकाऱ्यांशिवाय अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात फारसा रस घेतल्याचे दिसत नाही. पुढाऱ्यांपैकी खा. अशोकराव चव्हाण यांनी स्व-गणना करतानाचा व्हिडीओ करून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला. अन्य कोणी यात फारसा रस घेतल्याचे दिसले नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांची उदासीनता

वास्तविक आतापर्यंत किमान जेवढे प्रगणक व सहायक नेमले आहेत त्यांनी तसेच सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या माध्यमातून स्व-गणना करणे अभिप्रेत होते ; परंतु तसे झालेले दिसत नाही. शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच बहुतांश लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत उत्साह दाखविला नसल्याचे दिसून येते. नांदेड जिल्ह्यात हजारो शिक्षक, प्राध्यापक मंडळी असून त्यांनी सुद्धा यात सहभाग घेतल्याचे दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT