Locate stocks of chemically treated fruits and take strict action against the guilty: MLA Pawar
नांदेडः पुढारी वृत्तसेवा आंबा व इतर फळांची केमिकलद्वारे कृत्रिम पिकवणी करून नांदेड जिल्ह्यात विक्रीस आणले जात असल्याची बाब गंभीर असून विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या आंबा हंगाम सुरू असून विविध बाजारपेठा, फळ विक्रेते, घाऊक व्यापारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर आंब्यांची विक्री होत आहे. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी व उपलब्ध माहितीनुसार काही ठिकाणी आंबे व इतर फळे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी प्रतिबंधित रसायनांचा, विशेषतः कॅल्शियम कार्बाइड सारख्या धोकादायक पदार्थांचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॅल्शियम कार्बाइडचा वापर हा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन असून अशा प्रकारे पिकविण्यात आलेली फळे नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकतात, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
या प्रकाराची गंभीर जखम घेऊन नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रमुख फळ बाजारपेठा, गोदामे, कोल्ड स्टोरेज, घाऊक व किरकोळ फळ विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी. संशयित आआंबे व इतर फळांचे नमुने घेऊन ते शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. कैल्शियम कार्बाइड अथवा इतर प्रतिबंधित रसायनांचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यापारी, साठवणूकदार व जबाबदार व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, मागील तीन वर्षांत जिल्ह्यात कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याबाबत करण्यात आलेल्या कारवायांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, आधी मागण्या आमदार राजेश पवार यांनी या निवेदनात केल्या आहेत.