Leaders know the promise given by Ajit Pawar
नांदेड, पुढारी वृत्तसेवा माझ्या मंत्रिपदापेक्षा अजित पवार यांचे जाणे हे महाराष्ट्रासाठी अधिक वाईट असल्याचे सांगतानाच त्यांनी माझ्या बाबतीत जो शब्द दिला होता, तो पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांनाही माहीत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार २५ जानेवारी रोजी नांदेडला आले होते. त्यानंतर २८ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. नांदेडच्या शेवटच्या दौऱ्यात त्यांनी चिखलीकर यांच्या मंत्रीपदाबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले होते; पण नंतर त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांचे पालन कोण करणार, असा प्रश्न चिखलीकर समर्थकांच्या मनात निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रदिनी चिखलीकर यांनी आपली भावना व्यक्त केली. आधी विलासराव देशमुख आणि आता अजित पवार यांच्या जाण्यामुळे माझे, माझ्या मतदारसंघाचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांनी मला जो शब्द दिला होता, त्याची प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार या नेत्यांनाही कल्पना आहे, असा दावा चिखलीकर यांनी केला. पण मंत्रिपदापेक्षा अजितदादांचे जाणे हे जास्त दुः खदायक असल्याचे त्यांनी वारंवार म्हटले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विलीनीकरणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर आता मी मतप्रदर्शन करणे योग्य नसल्याचे चिखलीकर यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर चिखलीकर यांनी आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या भागांना भेटी देणे, लोकांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे सत्र सुरू केले आहे.