खासदार डॉ.शिवाजी काळगे pudhari photo
नांदेड

Nanded Political News : खासदार तर झालो, पण उत्पन्न घटले : डॉ.काळगेंची खंत!

विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात सत्ताधार्‍यांकडून पक्षपातीपणा होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड :अलीकडच्या राजकारणामध्ये एका प्रभागाचा नगरसेवक पाच वर्षांच्या कालावधीत आपले उत्पन्न व मालमत्ता वाढविण्यावर भर देत असताना, लातूर लोकसभेचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांचा अनुभव मात्र वेगळाच आहे. खासदार तर झालो, पण गेल्या वर्षभरात आपल्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे सांंगतानाच विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात सत्ताधार्‍यांकडून पक्षपातीपणा होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठवाडा विभागात व्यवसायाने डॉक्टर असलेली व्यक्ती आमदार-खासदार होऊन राजकारणात पुढे येण्याची परंपरा दिवंगत डॉ.बापू काळदाते यांच्यापासून लातूरमधूनच सुरू झाली. ते साल होते १९६७. त्यानंतरच्या सुमारे ६० वर्षांत मराठवाड्यात अनेक डॉक्टर्स आमदार-खासदार झाले. त्यांत आता डॉ.काळगे यांचे नाव विराजमान झाले आहे.

काही डॉक्टर राजकारण्यांची कारकीर्द अल्पजीवी ठरली, काहीजणं मंत्री झाले; पण नंतर सक्रिय राजकारणातून हद्दपार झाले. लातूरमध्ये विख्यात नेत्ररोगतज्ज्ञ असलेले डॉ.काळगे पहिल्याच प्रयत्नात लातूरमधून काँग्रेसतर्फे खासदार झाले; पण त्यानंतरच्या दोन वर्षांत त्यांना आर्थिक आघाडीवर खासदारकी फायदेशीर ठरण्यापेक्षा नुकसानकारक ठरल्याचे त्यांच्या वक्तव्यातून समोर आले आहे.

पूर्वीच्या डॉक्टर राजकारण्यांपैकी डॉ.काळदाते, डॉ.व्यंकटेश काब्दे, डॉ.टी.एस. पाटील, डॉ.माधव किन्हाळकर आदींनी राजकारणाच्या दलदलीमध्येही सचोटी राखली होती. आपल्या उत्पन्नाबाबत किंवा त्यात घट झाल्याबाबत त्यांनी कधी कैफियत मांडली नाही. मराठवाड्यातील एका डॉक्टर आमदाराची पहिलीच आमदारकी न्यायालयाकडून रद्दबातल झाल्यामुळे या माजी आमदारास पेन्शनच्या लाभापासून वंचित राहावे लागले. डॉ.काळगे यांनी आपल्या व्यावसायिक उत्पन्नात घट झाल्याचे सांगून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

दोन वर्षांपूर्वी निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी डॉ.शिवाजी काळगे यांचे नाव लातूरमधील नामांकित नेत्रतज्ज्ञ म्हणून स्थापित झाले होते. त्यांच्या रुग्णालयात नेत्ररुग्णांची प्रचंड गर्दी असायची; पण दोन वर्षांपूर्वी खासदार झाल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यांच्या रुग्णालयात आजही दुसर्‍या डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी व उपचार होत असले, तरी ते स्वतः वेळ देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मागील काळात त्यांनी ३५ लाखांहून अधिक प्राप्तीकर भरला होता; पण आता त्यांच्या प्राप्तीकरामध्ये पावणेनऊ लाखांमध्ये घसरण झाली आहे. त्याअनुषंगानेच ‘माझे उत्पन्न घटले हो’ असा टाहो त्यांनी फोडला.

राजकीय क्षेत्रातील सराईत नेते व लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या तिजोर्‍या भरत असताना डॉ.काळगे यांनी आपल्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे माध्यमांसमोर जाहीर केल्याने तो आता चर्चेचा विषय झाला आहे. ते विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडून होत असलेल्या अन्यायाकडेही त्यांनी लक्ष वेधले. नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ काळगे यांच्या लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. वरील भागातील विकास कामांसाठी पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

  • लोहा-कंधार मतदारसंघाला खासदार काँग्रेसचा, तर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा लाभला आहे. नांदेड जिल्ह्याच्या विकास आराखड्यातील कोट्यवधींच्या निधीतील मोठा वाटा राज्यसभेच्या खासदारांना दिला जात असताना लोकांकडून निवडून आलेल्या खासदारांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. काळगे यांची तक्रार त्यांच्यापुरती रास्त असल्याचे मत आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील भाजपा आमदारांच्या तुलनेत माझ्याही वाट्याला निधी कमी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT