Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सिंधुदुर्ग हळहळला!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी ः राजकीय नेते मंडळींनी वाहिली श्रद्धांजली
Ajit Pawar Death
Ajit Pawar Death
Published on
Updated on

सिंधुदुर्ग ः बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हळहळला. बुधवारचा दिवस उजाडला तोच मुळात अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने, ही बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून प्रशासनावर वचक असलेला, वेळेचे महत्त्व जाणणारा, एक शिस्तप्रिय अभ्यासू नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान : आ. नीलेश राणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आ.नीलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, सकाळीच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच धक्का बसला. त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सन 2009 साली आपण पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो, त्या वेळी माझ्यासोबत प्रचारासाठी येणारे पहिले नेते अजित पवार होते. त्या काळापासून त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. आता आमदार झाल्यानंतर सुद्धा विधानसभेत एका नव्या आमदाराला कुठेही अडचण येऊ नये यासाठी अजितदादांच्या विभागाचे माझ्यावर विशेष लक्ष असायचे. अनेक गोष्टी न मागताही ते मला देत असत. असा दिलदार, मनमोकळा आणि संवेदनशील नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून अचानक निघून जाणे ही राज्यासाठी मोठी हानी आहे.

सकाळी 6 वा. सुरू होणारी कार्यशैली आठवणीत राहिली : वैभव नाईक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची दुःखद बातमी समजताच मन हादरून गेले. अजित पवार यांच्यासोबत आपणास जवळपास दहा वर्षे विधानसभेत काम केले. या काळात अनेक वेळा त्यांच्या सहवासात राहण्याचा आणि संवाद साधण्याचा योग लाभला. ते प्रत्येक क्षण कामासाठी झटणारे नेतृत्व होते. सकाळी 6 वा. पासून त्यांच्या दिनचर्येची सुरुवात होत असे. सकाळी 6 वा. होणाऱ्या बैठकींना अनेक वेळा आपण व आपले सहकारी उपस्थित राहिलो होतो. त्यांचे निधन ही धक्कादायक घटना आहे, अशा शब्दांत ठाकरे सेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्र व सहकार क्षेत्राची मोठी हानी: सतीश सावंत

सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनीही अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून ते आमच्या कायम संपर्कात होते. अजित पवार हे समाजाभिमुख व सहकार क्षेत्रातील एक चांगले नेतृत्व होते. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकी निमित्ताने ते माझ्या प्रचारासाठी आले होते. सिंधुदुर्ग बँकेच्या कामकाजाविषयी ते समाधानी होते. तसेच कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे यासाठी त्यांचे मार्गदर्शन असायचे. त्यांच्या अपघाती निधनाने प्रशासनात दरारा असणारा महाराष्ट्रातील एक ‌‘दादा‌’ आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. असे नेतृत्व पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत सतीश सावंत यांनी आदरांजली वाहिली.

सर्वसामान्य कार्यकर्ता पोरका : अबिद नाईक

गेली 30 वर्षांपासून पवार कुटुंबीयांशी माझे निकटचे संबंध आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या अकाली निधनाने आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पोरका झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवार कुटुंबीयांशी आमचे संबंध आहेत. वेळोवेळी आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. 3 वर्षापूर्वी अजितदादांनी आपल्यावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. सिंधुदुर्गवासीयांचे अजित दादांवर प्रेम होते. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नावाने हाक मारणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांंच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून न येणारी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नेहमीच त्यांनी सन्मान दिला असे सांगत अबिद नाईक यांनी त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

वेळ पाळणाऱ्या अजितदादांची वेळेआधीच ‌‘एक्झिट‌’: प्रमोद जठार

प्रशासकीय कामाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या बैठकांना वेळेवर पोहोचणारे अजित दादा आपल्या आयुष्यात मात्र वेळेपूर्वीच सर्वांमधून निघून गेले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अजित दादांच्या रुपाने एक दादा माणूस गेला. त्यांच्याबरोबरच्या दोन गोष्टी आपल्या कायम लक्षात आहेत. आपण आमदार असताना विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता तेव्हा ऊर्जामंत्री असलेल्या अजित दादांनी गंमतीने मला ‌‘अहो जठार 1 मेगावॅटचा प्रकल्प का मागता तुम्हाला 10 मेगावॅटचा पवनऊर्जा प्रकल्प मंजूर करतो.‌’ असे सांगितले. आज जो देवगडच्या किनाऱ्यावर पवनऊर्जा प्रकल्प उभा आहे तो अजितदादांमुळेच उभा आहे. देवगडमध्ये आंबा उत्पादक संघाचा कॅनिंग प्रकल्प अजित दादांनी 15 मिनिटात मंजूर केला होता. तत्कालीन पणनमंत्र्यांना निर्देश देत हे काम त्यांनी मार्गी लावले होते. कोकणवर त्यांचे विशेष प्रेम होते. कोकणातील मंडळी फारसा निधी मागत नाहीत तसेच काहीवेळा निधीही संपूर्ण खर्च होत नाही त्यामुळे कोकणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यायला हवा, अशी अजित दादांची भावना होती. अशा शब्दांत भाजपचे माजी आ. प्रमोद जठार यांनी श्रद्धांजली वाहिली.

राजकारणातील ‌‘दादा‌’ माणूस गेला : संदेश पारकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. महाराष्ट्राचे ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते. जनमाणसावर प्रभाव असलेले डॅशिंग व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. मनाचा मोठेपणा असलेला राजकारणातला दादा माणूस आज गेला आहे. सिंधुदुर्ग, कणकवलीच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे. 2003 साली झालेल्या कणकवली न.पं. च्या पहिल्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून आपण निवडून आल्यानंतर आणि आमची सत्ता आल्यानंतर कणकवलीच्या विकासाला त्यांनी भरीव निधी दिला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

स्पष्टवक्तेपणा व निर्णयक्षम नेतृत्व गमावले : अमित सामंत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे: एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व आपण गमावले आहे. सन 1982 पासून राजकारणात पदार्पण केल्यानंतर जो माणूस कधीही थांबला नाही असं प्रशासकी यंत्रणेवर वचक असलेला नेता हरपला. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी घेतलेला ठाम भूमिका विकासभिमुख दृष्टिकोन आणि प्रशासनातील योगदान कायम स्मरणात राहील,त्यांच्या जाण्याने सार्वजनिक व राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे.अशी श्रद्धांजली सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला.

राजकारणातील बुलंद आवाज हरपला : धीरज परब

महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धुरंधर, बुलंद आवाज आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भल्या पहाटे कामाला लागणारा, अभ्यासू आणि विकास कामांसाठी झटणारा नेता हरपला असल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी व्यक्त केली. अजित पवार हे त्यांच्या कामाच्या प्रचंड उरकेसाठी आणि अधिकाऱ्यांवर धाक राखण्यासाठी ओळखले जात होते. विकासकामांचा ध्यास: महाराष्ट्राच्या राजकारणात एक धुरंदर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती, जे आपल्या कामातून ठसा उमटवत असत. सर्वसामान्यांचा नेता, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण हलवणारा एक नेता हरपला. त्यांच्या अकाली निधनाने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्याच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबीयांना या दुखःद घटनेतून सावरण्याची ताकद ईश्वर देवो.असे मत मनसे, सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी व्यक्त केले.

राजकारणातील धुरंधर नेता हरपला ःराजा गावकर

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवून विक्रम करणारे तसेच राजकारणातला एक उत्तम प्रशासक, कणखर नेतृत्व, कडवट कार्यकर्ता आणी कार्यकर्त्यांचं दुःख जाणून घेणारा, कार्यकर्ते व जनतेचे प्रश्न सोडवणारा असा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने आपण गमावला आहे. राजकारणातील एक धुरंधर नेता आपल्यात नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मालवण तालुकाध्यक्ष आणि शिंदे शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रवक्ते राजा गावकर यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर बघितल्यानंतर काळजात धस्स झाले. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजितदादां सारख्या नेत्याबरोबर पाच वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीत प्रभाग अध्यक्ष ते तालुकाध्यक्ष पर्यंतच्या माझ्या प्रवासात दीपक केसरकर, उदय सामंत, किरण पावसकर यांच्याबरोबर अजितदादा यांचाही सहवास आम्हाला लाभला. कामाच्या निमित्ताने व संघटनेच्या निमित्ताने अजित पवार यांना जवळून पाहता आले. त्यांचा रुबाब, त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची शैली, त्यांचा वक्तृत्वपणा हे सगळं माझ्या मनाला भावले.

अजित पवार यांच्या डिक्शनरी मध्ये ‌‘बघतो‌’, ‌‘करतो‌’ हे शब्द नव्हते, कुठचंही काम घेऊन गेल्यानंतर ते जाग्यावरती त्याचा निवाडा करत असत. काम होईल की नाही याबाबत अजित पवार यांच्यात स्पष्टवक्तेपणा होता. मालवणमध्ये राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते, त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या भेटीत मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तालुकाध्यक्ष होतो एवढे सांगल्यावर बरोबर अजित दादांनी “अरे हो पण आत्ता कुठे आहेस” असे विचारले होते. त्यावेळी मी शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करतोय असे सांगितल्यावर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत ‌‘हे माझं दुर्दैव‌’ असे म्हटले होते. त्यावेळी दादांचे हे शब्द काळजाला चटका लावून गेले. आज अजितदादा यांच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत. एक उत्तम प्रशासक, प्रशासनावर चांगली पकड व चांगली जरब असणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजितदादांच्या या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही मोठा धक्का : प्रसाद रेगे

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसाद रेगे यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अकाली निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः सिंधुदुर्गसाठी मोठा धक्का आहे. ‌‘अजित दादांचे नेतृत्व जनतेच्या हृदयाशी जोडलेले, ‌‘बोले तैसा चाले‌’ असे ते व्यक्तिमत्व होते, प्रशासनावर पकड ठेवणारे आणि विकासाला गती देणारे होते. त्यांचा असा नेहमीचा स्पष्ट आणि ठाम शब्द आता गमावला गेलाय. पवार कुटुंबीयांवर झालेला हा आघात आमच्यावरही परिणाम करणारा असल्याची भावना श्री. रेगे यांनी व्यक्त केली.

आम्ही सर्व पोरके झालो ः एम. के. गावडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.के. गावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर दुःख व्यक्त केले. गावडे म्हणाले, अजित दादांचे जाणे मनाला अजूनही पटत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर प्रचंड आघात झाला आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने मोठे नुकसान सहन केले आहे. त्यांच्या निधनाचे दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र हेच त्यांचे कुटुंब होते. गावडे पुढे म्हणाले, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांपासून ते उच्च नेत्यांपर्यंत, अजित दादा सर्वांना सहज भेटत होते. जे काम त्यांच्याकडे नेले जात असे, ते होऊन जात असे. आमच एक स्लोगन होतं,‌‘अजित दादा, एकच वादा‌’. कारण जे वचन त्यांनी दिलं, ते त्यांनी नेहमी पूर्ण केलं, कोणीही त्यांना थांबवू शकत नव्हतं.आज अनेक नेते असतील, पण अजित दादांसारखा नेता पुन्हा कधीही होणार नाही. त्यांचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व असामान्य होते. त्यांच्या अचानक निधनाने राज्यात निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. कोकणातील आमचे प्रश्न, मंत्रालयाशी संबंधित कामे, सगळे ते सोडवित असत. त्यांच्या जाण्याने कोकणासह राज्याचे मोठे नुकसान झाले. आज आम्ही सर्व पोरके झालो आहोत. त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली, असे गावडे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news