नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत किनवट पोलिसांनी घोटी फाटा शिवारात धाड टाकून 'तिर्रट' जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घोटी फाटा ते मलकापूर खेरडा रोडवरील एका शेतात काही जण बेकायदेशीररीत्या पैशांवर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत अभिजित ऊर्फ राजु कन्हाळे, बालाजी राठोड, मारोती कदम आणि प्रभाकर शिंदे या चार जणांना जुगार खेळताना रंगेहाथ आले. पकडण्यात त्यांच्याकडून ४७ हजार ६०० रुपये रोख, ३० हजारांचे तीन मोबाईल आणि ६० हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल असा एकूण १ लाख ३७हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.