अरुण तम्मडवार
किनवटः देशातील रेल्वेस्थानकांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश होऊनही किनवट रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. सुमारे २३ कोटी रुपये खर्चाच्या या कामाला सुरुवात होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून, डिसेंबर २०२५ ही निर्धारित मुदतही संपली आहे. तरीही काम अपूर्णच असल्याने आधुनिक सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. विशेष म्हणजे, स्थानकाच्या विकासकामामुळे निर्माण झालेल्या पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश होता. किनवटसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील महत्त्वाच्या स्थानकाला या योजनेत स्थान मिळाल्याने परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ६ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पायाभरणी करण्यात आली, तर स्थानिक पातळीवर आमदार भीमराव केराम यांच्या हस्तेही भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर स्थानकाचा कायापालट होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या संथगतीमुळे हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही.
कामातील विलंबाबाबत बांधकाम अभियंत्यांशी संपर्क साधला असता, संबंधित विभागाकडून आवश्यक रेखाचित्रे (ड्रॉइंग) उशिरा प्राप्त झाल्याने अंमलबजावणीत विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानकाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर असून, उर्वरित कामाला गती देऊन येत्या तीन महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे नांदेड येथील स्थापत्य अभियंत्यांनी सांगितले. मात्र, आधीच निर्धारित कालमर्यादा उलटल्याने नव्याने दिलेले हे आश्वासन कितपत पाळले जाते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुनर्विकासाच्या कामामुळे स्थानक परिसरातील वाहतुकीत बदल करून प्रवाशांच्या ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत असून, पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी आणि लहान मुलांना या मार्गावरून ये-जा करताना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या सुरक्षिततेमुळे या मार्गावरील प्रवास अधिक धोकादायक बनत असून, अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा असतानाच पर्यायी रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याच योजनेत समाविष्ट असलेल्या आदिलाबाद आणि हिमायतनगर रेल्वेस्थानकांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने गेली असताना, किनवटमधील काम मात्र मागे पडल्याचे चित्र आहे. आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम परिसरातील प्रवाशांसाठी किनवट स्थानकाचे महत्त्व लक्षात घेता, या कामातील विलंबाबाबत स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेच्या विकासकामांमध्ये स्थानिक गरजा आणि प्रवाशांच्या सोयींना प्राधान्य मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मूलभूत ये-जा व्यवस्थेचीही गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
या पुनर्विकास प्रकल्पातून स्थानकाला आकर्षक दर्शनी भाग, प्रशस्त प्रवेशद्वार, सुधारित प्रकाशव्यवस्था, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, लिफ्ट आणि एस्केलेटर यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच स्थानकाला आधुनिक स्वरूप मिळणार आहे. मात्र, काम अपूर्ण असल्याने या सुविधांचा लाभ अद्याप प्रवाशांना मिळालेला नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीबाबत स्पष्टता आणि काम पूर्ण होण्याची निश्चित तारीख मिळणे आवश्यक बनले आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किनवट स्थानकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून विलंबाची कारणे दूर करावीत, उर्वरित कामासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी आणि तोपर्यंत पर्यायी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक व रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. आधुनिक स्थानकाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी केवळ निधी आणि आराखडा पुरेसा नसून, निर्धारित वेळेत दर्जेदार काम पूर्ण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.