Bear attack death Kinwat
किनवट : दयाळ धानोरा येथे १० फेब्रुवारी रोजी झालेल्या अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चंद्रसिंग शेषराव राठोड यांचे सहा दिवस उपचारानंतर १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या वारसांना शासनाकडून वन्यप्राणी हल्ला नुकसानभरपाई योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करून धनादेश सुपूर्द करण्यात आला. मृत्यूनंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी मदत मिळाल्याने शोकाकुल कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या नऊ शेतकऱ्यांवर अचानक अस्वलाने हल्ला चढविला होता. या घटनेत दत्ता बळीराम जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर चंद्रसिंग राठोड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, घाटी येथे उपचार सुरू होते; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
मृतांच्या वारसांमध्ये पत्नी कल्पनाबाई चंद्रसिंग राठोड व दोन अल्पवयीन मुले कुमार आणि धर्मराज यांचा समावेश आहे. त्यांना १० लाख रुपयांचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) आप्पारावपेठ उमेश ढगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी श्रीराम व्ही. सज्जन, वनरक्षक डी. डी. कडमपल्ले, कृष्णा घायाळ, आर. आर. वनवे, संतोष बारगुडे, गणेश सपकाळ, बी. टी. जाधव, वसंत भालेराव, वाहन चालक ज्ञानेश्वर माहूरे, संगणक चालक कुलदीप पाटील तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकरणात आमदार भीमराव केराम यांनी शोकाकुल कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी वन व महसूल प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे मदत प्रक्रिया गतीने पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, याच घटनेत १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झालेल्या दत्ता बळीराम जाधव यांच्या वारसांनाही १३ फेब्रुवारी रोजी शासनाकडून नियमानुसार मदत देण्यात आली आहे. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य शेतकऱ्यांच्या प्रकरणीही मदत मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.
सलग दोन मृत्यूंमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने संबंधित अस्वलाला पकडले आहे. वनालगतच्या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.