

Kinwat Dayal Dhanora bear attack
किनवट : दयाळ धानोरा येथे १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मादी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चंद्रसिंग शेषराव राठोड (वय ३४) यांचा सोमवारी (दि. १५) सकाळी सुमारे १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या नऊ शेतकऱ्यांवर चिडलेल्या मादी अस्वलाने अचानक हल्ला केला होता. या घटनेत दत्ता बळीराम जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले होते. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर होती. चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
राठोड यांच्या पश्चात पत्नी, १२ व ८ वर्षांचे दोन मुलगे, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, घटनेनंतर वन विभागाने राबविलेल्या शोधमोहीमेत संबंधित मादी अस्वलाला पकडण्यात यश आले आहे. मृत व जखमींच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असली, तरी दुसऱ्या मृत्यूनंतर अधिक आर्थिक सहाय्य व पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सलग दोन मृत्यूंमुळे दयाळ धानोरा व परिसरात शोककळा पसरली आहे.