Pan Ganga river water release
उमरखेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज (दि. 16) दुपारी 12 वाजता आणखी दोन गेट प्रत्येकी 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.
धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने सांडव्यावरील एकूण नऊ वक्रद्वारे 50 सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या पैनगंगा नदीपात्रात 14,963 क्युसेक (423.688 क्युमेक्स) इतका विसर्ग सोडला जात आहे. धरणाच्या पाण्याच्या पातळीत होणाऱ्या वाढ-घटीनुसार पुढील काळात विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे पुरनियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे.
या पाण्याचा परिणाम नदीकाठावरील गावांवर होऊ शकतो. पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यास शेतकरी बांधकामे, शेतमाल तसेच जनावरांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषतः नदीपात्रात जाऊन मासेमारी करणे, वाळू उपसा करणे किंवा जनावरे चरण्यासाठी नेणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा ओघ कायम असून धरणातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे विसर्ग काही दिवस चालू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदीकाठावरील तसेच पूरबाधित होण्याची शक्यता असलेल्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन ईसापूर धरण पुरनियंत्रण कक्ष तसेच स्थानिक प्रशासनाने केले आहे.