Invitation Amrit Mahotsav People's College Nitin Gadkari
विशेष प्रतिनिधी
नांदेड : मागील २० वर्षांचा 'मागोवा' घेता, बेकायदेशीर कारभारी अशी ज्यांची 'ओळख' आहे. अशा संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ भाजपा नेते-केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीस गेले आणि त्यांना 'नांएसो'च्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन आले. या भेटीचा 'जागर' आता केला जात आहे.
नांएसो आणि या संस्थेतर्फे चालविण्यात येणारी दोन महाविद्यालये मागील आठवड्यात चांगल्या नव्हे तर वाईट कारणांमुळे गाजली. यांतील 'पीपल्स' महाविद्यालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष सध्या सुरू असून त्यानिमित्त नियोजित कार्यक्रमाचे निमंत्रण गडकरी यांना देतानाच या शिष्टमंडळाने त्यांना नरहर कुरुंदकर यांचे 'जागर' आणि इतर भरमसाठ पुस्तके सप्रेम भेट दिली.
धर्मनिरपेक्ष डाव्या विचार सरणीतील कृतिशील मंडळींनी 'नांएसो' संस्था आणि पीपल्स कॉलेज नावारुपास आणले. स्वामी रामानंद तीर्थ, भगवानराव गांजवे, गोविंदभाई श्रॉफ, स.दि. महाजन, म.द.पाध्ये यांच्यानंतर ज्या मंडळींच्या ताब्यात संस्थेची सूत्रे आली आहेत, त्यांतील डॉ. व्यंकटेश काब्दे वगळता कोणाचेही सभासदत्व वैध नाही. अशा बेकायदेशीर कार्यकारिणीतर्फे गडकरी यांना निमंत्रण देण्यात येताच, दुसऱ्या एका गटाने गडकरी यांना संस्थेतील खरी स्थिती कळविण्याची तयारी चालविली आहे.
एक मोठी नामांकित संस्था, गौरवशाली परंपरा सांगणारे पीपल्स कॉलेज; पण आपणच कारभारी असल्याचे सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांतील एकही जण गडकरींकडे गेला नाही. नागपूरला गेलेल्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांत पसरवली जात आहेत. त्यांच्यामध्ये प्राचार्य लक्ष्मण शिंदे, बालाजी कोंपलवार, नौनीहालसिंघ जहागिरदार, दीपनाथ पत्की इत्यादींचा समावेश होता.