'Innovage' bogus seed case Take action on sales license - Nanded Agriculture Department letter to the Director
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात बोगस 'सोयाबीन' बियाणे विक्रीत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही अहवालात नमूद आहे. बोगस बियाणे प्रकरणातील 'इनोव्हेज १०८' सोयाबीन बियाणाचा गार्ड नमुना संबंधित कंपनीने उपलब्ध करून न दिल्याचा ठपकाही कृषी विभागाने ठेवला असून या बियाण्याच्या विक्री 'परवान्या'वरच योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा लेखी प्रस्तावच नांदेड जिल्हा कृषी विभागाने राज्य कृषी आयुक्तालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या संचालकास पाठवल्याने बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अर्धापूर तालुक्यातील 'देळूब' (बू) येथील शेतकरी बालाजी बाबूराव हेंद्रे यांनी नांदेड येथील बालाजी कृषी सेवा केंद्रातून विकत घेतलेल्या 'इनोव्हेज १०८' वाणाचे सोयाबीन बियाणे सदोष आढळल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. यामुळे शेतकरी बालाजी हेंद्रे यांचे १ लक्ष ४३ हजार ८५६ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा सुपष्ट अहवालही कृषी विभागाने दिला आहे.
शेतकऱ्याची बोगस बियाणे प्रकरणात फसवणूक झाल्याचे कळताच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी इनोव्हेज १०८ (पीएस ९८९) सोयाबीन बाण निर्मिती करणाऱ्या मध्यप्रदेशातील इंदोर येथील पार्श्व जेनेटिक्स इंडिया एलएलपी यांना लेखी पत्र पाठवून संबंधित कृषी विभागाच्या अहवालाप्रमाणे १ लक्ष ४३ हजार ८५६ रु. आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, असा बडगा उजारल्याने बोगस बियाणे विक्री प्रकरणातील बियाणे कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी शेकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या. परंतु या प्रकरणी किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे, हे अद्याप पुढे आलेले नाही. 'इंगल' कंपनीकडूनही देळूब (बू) येथील ८० वर्षांच्या चिमाबाई थोरात (मुलगा सुरेश थोरात) यांची फसवणूक झाली असून बियाणे सदोष आढळल्याने ४० हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या मालामाल आणि शेतकरी मात्र कंगाल होण्याचे चित्र दिसत असताना फसवणूक झालेल्या बालाजी हेंद्रे आणि चिमाबाई थोरात (सुरेश थोरात) यांना अजूनही संबंधित बियाणे कंपन्याकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही.
शेतकऱ्याकडून गुन्हा नोदवला जाणार.
शेतकऱ्यांची फसवणूक करून बोगस सोयाबीन विक्री करणाऱ्या संबंधित बियाणे कंपनी आणि दुकानदारावर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करू, अशी माहीती बोगस बियाणे प्रकरणात फसवणूक झालेले शेतकरी बालाजी हेंद्रे यांनी दिली आहे.
शेतकऱ्याच्या तक्रारी नंतर 'इनोव्हेज' १०८ (पीएस ९८९) सोयाबीन बियाणे सदोष आढळून आले आहे. वेळोवेळी संपर्क करूनही या सोयाबीन बियाणाच्या वाणाचा 'गार्ड नमुना' उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित कंपनीच्या सोयाबीन बियाणे विक्रीच्या परवान्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी, असे लेखी पत्र कृषी आयुक्तालयाच्या गुण-वत्ता नियंत्रण विभागाच्या संचालकास पाठवले आहे.दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड.