नांदेडमध्ये शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा File Photo
नांदेड

नांदेडमध्ये शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा

महायुतीचे संख्याबळ ४९ वर; स्वतंत्र लढले, पण सत्तेसाठी एकत्र

पुढारी वृत्तसेवा

In Nanded, the Shiv Sena gives unconditional support to the BJP

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी, आता शिवसेनेने (शिंदे गट) भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (दि. २४) भाजपचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे (उत्तर) आमदार बालाजी कल्याणकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या निर्णयामुळे महापालिकेत भाजप (४५) आणि शिवसेना (४) असे मिळून महायुतीचे संख्याबळ आता ४९ वर पोहोचले आहे.

महापालिका निवडणुकीत जागावाटपावर एकमत न झाल्याने भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यात भाजपला ४५ जागांवर घवघवीत यश मिळाले, तर शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागले. "निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला. त्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांच्याशी चर्चा झाली आणि महापालिकेत 'महायुती' म्हणून एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेने यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे, अशी माहिती खा. अशोक चव्हाण यांनी दिली. यापुढे महापालिकेत महायुतीचे गटनेते म्हणून भाजपचे नगरसेवक अॅड. महेश कनकदंडे हे काम पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबावत विचारले असता चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडून आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी त्यांचा विचार नाही." तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युती होणार का? या प्रश्नावर 'पुढचं पुढे बघू असे म्हणत चव्हाण यांनी अधिक बोलणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणारे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अनुपस्थित होते.

आजारी असूनही बोंढारकरांचा पाठिंबा

पत्रकार परिषदेत आ. बालाजी कल्याणकर यांनी, आमची कोणतीही अट नाही, आम्ही विकासासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असे जाहीर केले. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत आपलाही बिनशर्त पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT