नांदेड

Nanded Crime | पाटोदा परिसरात अवैध सागवान वाहतूक उघड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

या सागवानची पाटोदा नियतक्षेत्रातील राखीव वन क्षेत्रात अवैधरित्या तोड करण्यात आली होती

पुढारी वृत्तसेवा

किनवट : पाटोदा नियतक्षेत्रातील राखीव वन क्षेत्रात अवैधरित्या तोड करण्यात आलेल्या सागवान लाकडाची वाहतूक करणारी ऑटोरिक्षा वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडली. या कारवाईत सागवान लाकूड व वाहनासह ६० हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १५ जून रोजी सायंकाळी पाटोदा नियतक्षेत्रातील राखीव वन रस्त्यालगत अवैध वृक्षतोड करून, सागवान लाकडाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बोधडी येथील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून चिखली बु. गावाच्या दिशेने जाणाऱ्या विनानंबर ऑटोरिक्षाचा पाठलाग केला. वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये सागवानाचे आठ गोल नग आढळून आले. या लाकडाचे घनफळ ०.४९२ घनमीटर असून त्याची किंमत १० हजार ४०५ रुपये असल्याचे वन विभागाने सांगितले. जप्त करण्यात आलेल्या ऑटोरिक्षाची अंदाजित किंमत ५० हजार रुपये असून एकूण ६० हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणात जुबेर खैरोद्दीन शेख व मारुती गुरुनाथ केसाळे (दोघेही रा. चिखली बु.) यांना घटनास्थळी पकडण्यात आले. तर शेख मज्जु शेख इद्रीस आणि शेख जाकीर शेख अहमद हे दोघे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ आणि गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याचे वन विभागाने सांगितले.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत वनगुन्हा क्रमांक ०३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. अटक आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, किनवट येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने १८ जूनपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

उपवनसंरक्षक मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) नांदेड आणि बोधडीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.पोतुलवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईत वनपाल शेळके, के. एम. बडूरे, जी. पी. निलपत्रेवार, वनरक्षक विद्या बोर्डे, नरेंद्र चुकलवार, आकाश रंगे, एस. पी. काळे, डी. एम. गड्डे, के. एस. खोत, पवन दांडगे, अमर मुराडे, पवन सोनूने तसेच लिपिक ओमप्रकाश मारकवाड यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT