बिलोली ः राहेर येथील नदीपात्रातून सोमवारी रात्रीला चोरीने काळी रेती घेऊन जाणारे वाहन महसूल पथकाने गागलेगाव पकडले. नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांनी ही कारवाई केली. पकडलेली हायवा (एम.एच 15 जी.व्ही 1111) तहसील कार्यालयात लावली आहे.
मागील आठवड्यात तहसीलदार बालाजी मिठेवाड यांनी रात्रीला सापळा रचून कार्ला फाटा येथे रेतीने भरलेला एमएच 12 एचडी 2505 क्रमांकाची हायवा, सगरोळी रोड हिप्परगा येथे एपी 21 टी वाय 4608 क्रमांकाचा ट्रक पकडून कारवाई केली.
सद्यस्थितीत मांजरा नदीपात्रातून रेती चोरीला काही प्रमाणात ब्रेक बसला असला तरी रेती तस्कर पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. राहेर, हुस्सा येथिल रेतीतस्करांनी बोटी, तराफ्यांच्या सहाय्याने नदीपात्रात रेती चोरीचा उपसा करीत आहेत. ठिकठिकाणी अनेक बोटी, तराफे लावून अमाप रेती उपसा करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत.
हा प्रकार महिन्यापासून जोमात सुरू होता. रेती, माती तस्करांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तक्रारींमुळे महसूल प्रशासनाला बदनामीला समोर जावे लागत असल्यामुळे प्रशासन ॲक्शनमोडवर आल असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.