Illegal sand mining; Revenue along with police take strong action
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : उस्माननगर, कुंटूर, मुदखेड पोलिस आणि महसूल पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून अवैध रेती उपसा ठिकाणावर कारवाई करून बोट, इंजिनसह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पोलिस आल्याचे पाहून अवैध रेती उपसा करणारे पळून गेले.
उस्माननगर ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार हे आपल्या सहकाऱ्यांसह ९ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी मौजे कामळज, येळी, शंकतीर्थ शिवारातील गोदावरी पात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणारे एक कोटी रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
त्यामध्ये फायबरच्या चार बोट, चार छोट्या इंजिन बोट, रेती उपसा करणारे साहित्यांचा समावेश आहे. पंचनामा करून आरोपी शंकर प्रकाश भरकडे, संतोष ज्ञानेश्वर भरकडे (रा. कौडगाव), संजय शेषेराव जाधव (रा. चिंचोली), भगवान पंडित भोग (रा. मारताळा) यांच्याविरुद्ध पोउपनि संजय मुंडे यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सपोनि संजय निलपत्रेवार, पोउपनि गजानन गाडेकर, सपोउपनि हंबर्डे, पोहेकॉ शेख, गंगाधर चिंचोरे, पवार, प्रकाश पेदेवाड, माधव पवार, जुन्ने, राठोड आदींनी केली.