नायगाव तालुक्यातल्या होटाळा परिसरातील अवैध मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होता. नागरिक वारंवार तक्रारी करत होते, व्हिडिओ-फोटो व्हायरल होत होते, पण महसूल विभाग मात्र शांत बसला होता. अखेर तब्बल दोन आठवड्यांनंतर महसूल विभागाने गुन्हा दाखल केला, मात्र ही कारवाई झाली तरी दाखवण्यासाठीच झाली, असा आरोप आता सर्रासपणे जनतेत होत आहे. गुन्हा दाखल झाला म्हणजे न्याय मिळाला असे नाही, तर ही कारवाई फक्त धुळफेक आहे का, हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.
3 नोव्हेंबर रोजी महसूल विभागाने गट क्रमांक 125, होटाळा येथे धाड टाकून पोकलेन जप्त केली आणि सुमारे 50 ब्रास मुरूम चोरी झाल्याचा पंचनामा केला. त्यात 1,97,250 रुपयांची किंमत नमूद केली. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन, मोठ्या हायवाचे येणे-जाणे आणि मोठ्या यंत्रणांचा वापर होत असताना महसूल आणि पोलिसांना काहीही दिसत नव्हतं का, हा प्रश्न नागरिकांना छळतोय.
याहून मोठं आश्चर्य म्हणजे जप्त केलेल्या पोकलेनचा नंबर स्पष्ट दिसत असतानाही गुन्ह्यातील मालक आणि चालक “अज्ञात” असल्याचं नोंदवलं गेलं आहे. नंबर समोर, जेसीबी समोर… तरी मालक अज्ञात कसा? नंबरवरून मालकाचा शोध घेणे अवघड नाही, मग पंधरा दिवस उलटूनही आरोपी सापडले नाहीत, हे प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतं.
याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली धाडीदरम्यान अनेक हायवा महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत घटनास्थळावरून पळून गेले. पण या घटनेचा पंचनाम्यात कुठेही उल्लेख नाही. मुद्दाम माहिती लपवली का? मोठ्या माफियांचा बचाव करण्यासाठी पंचनाम्यात बदल करण्यात आला का? हा प्रश्न आता संपूर्ण तालुका विचारत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महसूल विभाग आणि पोलिस विभाग दोघेही या कारवायांमध्ये फक्त पाहुणे बनून उभे असतात. काही निवडक, तुरळक कारवाया करून माफियांची पाठ थोपटण्याचं काम केलं जातं.
दरम्यान, जप्त केलेली पोकलेन राहेर येथील असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर जोरात आहे. पोकलेन कुठून आली हे गावातील प्रत्येकाला माहिती असताना महसूल विभागाला मात्र माहिती “नसल्याचं” दाखवण्यात येत आहे. ही माहिती मुद्दाम लपवली गेली की कोणी तरी प्रभावी व्यक्ती वाचवण्यासाठी संपूर्ण कागदपत्रे बदलली गेली, अशी चर्चा सुरु झाली आहे.
या प्रकरणाचा तपास नायगाव पोलीस ठाण्यातील पोहेका साई सांगवीकर यांच्या स्वाधीन देण्यात आला आहे. मात्र सांगवीकर यांचा कारभार ‘शिथिल’ असल्याची ओळख असल्याने या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाण्यात अनेक अधिकारी असताना तपास त्यांनाच देण्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे का, असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. “तपास सुरू होण्याआधीच बुडवण्यासाठी सांगवीकर बसवले काय?” असा तिखट सवाल लोक मांडत आहेत.