

Cooperative Societies Data Collection
उमरखेड : यंदा अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची संपूर्ण माहिती नव्याने संकलित करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सोसायट्यांनी कागदपत्रे गोळा करण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या नव्या प्रस्तावाची तयारी सुरू असल्याची चर्चा भागात जोर धरत आहे.
ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पाठविण्यात आलेल्या निर्देशांनुसार प्रत्येक कर्जदार सदस्यांची तपशीलवार माहिती तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
कर्जदारांकडून जी कागदपत्रे मागवली आहेत. त्यामध्ये 7/12 उताऱ्याची छायांकित प्रत, आधार कार्ड प्रत, फॉर्मर आयडी, पॅन कार्ड प्रत सेव्हिंग, जॉइंट खात्याची पासबुक प्रत, कर्जखात्याची सीसीसी प्रत, मोबाईल क्रमांक लिंक असल्याचा पुरावा आदींचा समावेश आहे.
काही कर्जदारांकडे मूळ कागदपत्रे नसल्यास त्यांची वर्साय, नोटरीकृत प्रत तातडीने देण्याची सूचना सोसायट्यांनी केली आहे. सर्व कर्जदारांनी पाच ते सहा दिवसांत ही कागदपत्रे सोसायटीकडे जमा करावीत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
सोसायटींच्या या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या कर्जमाफीच्या शक्यतेबाबत उत्सुकता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून शासनस्तरावर कर्जमाफीसंबंधी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच माहिती संकलनाचे काम राबविले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
सोसायट्यांचा स्पष्ट इशारा
जे सभासद मागितलेली कागदपत्रे वेळेत जमा करणार नाहीत, त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच राहील. तसेच सेव्हिंग खाते किंवा कर्ज खाते नसल्यानं नवीन खाते उघडण्याची सूचना देण्यात आली आहे. ग्रामीण भागात या नोटीसनंतर शेतकऱ्यांची सोसायटीकडे मोठी गर्दी दिसत आहे. कर्जमाफीचा मार्ग मोकळा होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.