नांदेड : मुखेड शहरात विनापरवाना आणि अनधिकृत बीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या तेलंगणातील एका व्यापाऱ्याविरूद्ध मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने ही धडक कारवाई केली असून, कारसह तब्बल 12 लाख 37 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून रोजी रात्री मुखेड येथील नवा मोंढा परिसरातील संगमेश्वर कृषी सेवा केंद्राजवळ एका कारमधून अनधिकृतपणे बीटी कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय भरारी पथकाने रात्रीच या परिसरात सापळा रचून संयुक्त कारवाई केली.
तपासणी दरम्यान, तेलंगणा राज्यातील भैसा (जि. निर्मल) येथील संशयित श्रीधर पेन्शलवार हा आपल्या कारमध्ये बीटी कापूस बियाण्यांचा साठा घेऊन विक्री करत असताना रंगेहात आढळून आला. कारमधील पोत्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये आरसीएच-668 या वाणाचे एकूण 192 पाकिटे सापडली. या बियाण्यांची किंमत 1 लाख 87 हजार 994 रुपये असून, 10 लाख 50 हजार रुपयांची कार, असा एकूण 12 लाख 37 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे गुणनियंत्रण तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अमोल पेकम, मुखेडचे कृषी अधिकारी अरविंद आकात आणि गुणनियंत्रण निरीक्षक कुलदीप वाघमारे यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली. जिल्हा अधीक्षक दत्तकुमार कळसाईत यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच खते, बियाणे घेण्याचे आवाहन केले आहे.
विक्री परवानाच नाही
चौकशीदरम्यान संशयित श्रीधर पेन्शलवार याच्याकडे महाराष्ट्रात बीटी कापूस बियाणे विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना, पक्की पावती किंवा कागदपत्रे आढळली नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित वाणाला महाराष्ट्रात विक्रीची परवानगीच नसल्याचे संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. कृषी विभागाने या संशयित बियाण्यांचे नमुने घेऊन ते बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.