नायगाव ः इजतगाव परिसरात पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई करीत सुमारे पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. गोदावरी नदी पात्रातून कांही दिवसांपासून रात्रीला काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून वाळूमाफियांचे जाळे बळकट झाले होते.
उपविभागीय अधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरूवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर, डंपर, टिपर अशी अनेक वाहने ताब्यात घेण्यात आली. नदीपात्रातील दोन बोटी बार उडवून नष्ट केल्या. दरम्यान काही वाहनचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
महसूल प्रशासनाच्या मूक संमतीमुळेच हा अवैध धंदा फोफावत असल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे संबंधित यंत्रणांचीही चांगलीच झोप उडाली आहे. यापूर्वीही विविध अवैध धंद्यांवर कारवाई करून ठसा उमटवणारे पानेगावकर यांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे. उपविभागीय अधीक्षक श्याम पानेगावकर यांनी इशारा देत सांगितले की, ‘अवैध वाळू उपसा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’ कारवाईनंतर इजतगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कुंटूर ठाण्याचे सपोनी विशाल भोसले व जाधव,ठाकूर, पल्लेवाड, कदम, मडके आदी सर्व कर्मचारी या कामी सतर्क झाले आहेत.
पुढील काही दिवस विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत पोलिस सूत्राकडून देण्यात आले आहेत. या कारवाईचा परिणाम म्हणून अंतरगावसह गोदावरी काठावरील इतर भागातील वाळू व माती माफियांची धाबे दणाणली असून, अनेक ठिकाणी अवैध उपसा थांबल्याचे चित्र दिसत आहे.