Heavy rains lashed Nanded district
नांदेड, पुढारी वृत्तसंस्था : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सर्वदूर पावसाने दोघांचा भिंत पडून मृत्यू झाला. तर किनवट तालुक्यात एक स्कूलबस वाहून गेली, सुदैवाने यात विद्यार्थी नसले तरी चालक मात्र बेपत्ता होता. दरम्यान, बराच शोध घेतल्यानंतर स्कूलबस चालकाचा मृतदेह सापडला आहे. काही भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे एनडीआरएफची पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कंधार तालुक्यातील कोटबाजार या गावातील पती-पत्नीचा भिंत कोसळून मृत्यू झाला. ग्रामपंचायत सदस्य असलेले शेख नाशेर शेख अमीन व त्यांची पत्री शेख हसीना शेख नाशेर हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे घरी झोपले होते. मध्यरात्री घराच्या पाठीमागील भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेख नाशेर यांनी काही दिवसांपूर्वी घरकुलासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना घरकुलाचे अनुदान मिळाले नाही. परिणामी ते आपल्या पडक्या घरातच वास्तव्यास होते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला.
किनवट तालुक्यातील बोधडी येथील स्कूलबस पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक नागरिकांनी चालकाला स्कुलबस पाण्यातून नेऊ नका असा सल्ला दिला, परंतु प्रेमसिंग पवार (वय 35) याने ही बस नदीच्या पुरातून नेली. सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नव्हते.
हिंगोली, पुढारी वृत्तसंस्था : जिल्हाभरात शनिवारी पहाटेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक गावांच्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. तर कयाधू नदीला पूर आला होता. शनिवारी जिल्हाभरात दिवसभर पाऊस सुरूच होता. ओढे, नाले व नद्यांना पूर आला होता. पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तर पिकांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, हळद पिकांला फटका बसला आहे.
लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील अनिल मुरहरी नाईक यांचा बैल तर वाळकी खुर्द येथील चंद्रकांत संभाजी गायकवाड यांची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली. चितळी येथील बळिराम पुंडलिक शामे यांच्या राहत्या घराचा काही भाग ढासाळला सुदैवाने यात जिवीतहाणी झाली नाही. पैनगंगा नदीवरुन पावसाचे पाणी वाहत असल्याने नांदेड नागपूर महामार्ग बंद करण्यात आला.
लातूर, पुढारी वृत्तसेवा : शुक्रवार व शनिवारी लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने निम्न तेरणा प्रकल्प व मांजरा धरणही भरल्याने पाणलोट क्षेत्रातून येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी तेरणा धरणाचे सहा तर मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 16.8 मि.मी. असा पाऊस नोंदला गेला आहे. उदगीर तालुक्यात सर्वाधिक 50.5 मि.मी. पाऊस झाला आहे. या तालुक्यातील वाढवणा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 84.8 मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे. औसा तालुक्यातील तावरजा प्रकल्प 73 टक्के भरला आहे. भुसणी बंधारा पूर्णपणे भरला आहे, परंतु त्याची दारे न उघडल्याने बंधार्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरले आहे. पिके, भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. गुरांच्या गोठ्यांनीही पाणी शिरले आहे. उसाचे फड आडवे झाले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणीत पिकांचे अतोनात नुकसान
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. पूर्णा तालुक्यात ताडकळससह लिमला शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. माटेगाव येथील दुधना नदीला पूर आल्याने पूर्णा ते झिरोफाटा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वालूर ते सेलू व मानवतरोड ते वालूर हाही रस्ता दुधना नदी तुडुंब भरून वाहत असल्याने बंद झाला.
शुक्रवारी जिल्हाभरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे लोअर दुधना कालवा फुटल्यामुळे परभणी तालुक्यातील मांडवा, डिग्रस, गोकुळवाडी व नांदापूर येथील जमीन खरडून गेल्या आहेत. पूर्णा तालुक्यातील ताडकळस, लिमला शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.