Heavy rains in Nanded district cause major damage to agriculture, disrupt normal life
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ऑगस्टमधील मघा नक्षत्रापासून तडाख्यांवर तडाखे देणाऱ्या पावसाने हस्त नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील उरलेसुरले पीक जमीनदोस्त करत तडाखेबंद सलामी दिली. शुक्रवारची सायंकाळ ते शनिवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्यातील २५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे नांदेड शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली.
हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. एकंदर अनुमान काढून प्रशासनाने शाळा-महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांना आधीच सुट्टी जाहीर करून टाकली होती. जिल्ह्याच्या बऱ्याच भागात शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने सायंकाळ ते शनिवारच्या सकाळपर्यंत हस्ताचे वाहन असलेल्या मोराच्या नजाकतदार थयथयाटाच्या विपरीत सर्वत्र टपटपाट केल्याचे दिसले. अनेक भागांत मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत धोधो पाऊस झाला.
बहुतांश भागात शनिवारची सकाळ जलधारांनीच उगवली. त्यानंतर समाजमाध्यमांतून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील विदारक, दारुण आणि चिंताजनक स्थितीची माहिती समोर येऊ लागली. मागील चार दिवसांपासून विष्णुपुरी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सुसाट झेपावल्यामुळे नदीकाठचा भाग आणि जिल्ह्यातील नदीकाठची अनेक गावे बाधित झाली. वरील प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडे असून दुपारपर्यंत त्यांतून १ लाख ८० हजार क्युसेक प्रवाहाने नदीपात्रात पाणी सोडले जात होते. वरून होणारी आवक लक्षात घेता शनिवारी रात्रीपर्यंत नांदेड शहरात गोदा वरी नदीतील पाणी ३५४ मीटर ही धोकापातळी ओलांडण्याची शक्यता मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यक्त केली आहे.
कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून पांडुरंग निवृत्ती कदम (वय ४७) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी शेतातून घरी येत असताना गावाजवळच्या रस्त्यावर अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यंदाच्या नैसर्गिक आ-पत्तीतील हा २७वा बळी असल्याचे सांगण्यात आले.
शहराच्या दुल्हेशाह रहमान नगर भागातील एका कुटुंबाच्या घरामध्ये गोदावरी नदीचे पाणी शिरल्यामुळे हे कुटुंब नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले होते. शनिवारी पहाटे त्यांच्या घरावर वीज कोसळल्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील सामान तसेच लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले.