Heavy rainfall in Biloli, Degalur and Mukhed talukas
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात ८ दिवसांत चारवेळा सलग अतिवृष्टीची नोंद झाली झाली. रविवारी (दि.२१) सकाळी झालेल्या नोंदीनुसार बिलोली, देगलूर व मुखेड तालुक्यातील ५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून प्रत्येक ठिकाणी १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देगलूर तालुक्यात ४८ मिमी, बिलोलीत ३७तर मुखेड मध्ये ३० मिमी पाऊस झाला. आजवर १२८.०८ टक्के पाऊस झाला.
सध्या उत्तरा नक्षत्र सुरु असून सप्टेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नवरात्रीत जोरदार पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ९.८२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गतवर्षपिक्षा २२ टक्के पाऊस जास्त झाला आहे. दि. २७ रोजी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करणार असून हे नक्षत्र सुद्धा जोरदार पावसाचे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबणारे हे स्पष्ट झाले आहे.
वार्षिक सरासरीची शंभरी गाठण्यात अद्याप बिलोली व धर्माबाद हे सख्खे शेजारी तालुके मागे असून या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ९२.५३ आणि ९९.४९ टक्के पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुदखेडमध्ये १३१ टक्के किनवटमध्ये १२६.६८ टक्के तर नांदेड तालुक्यात १२२.२७ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस सुरु राहिला तर अनेक तालुके १५० टक्क्यांच्या पुढे जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. नांदेड जिल्ह्यात आजवर पडलेला सरासरी पाऊस वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पाहिल्यास १०९.८२ टक्के झाला आहे.
रविवारी (दि. २१) सकाळी आदमपूर (ता. बिलोली) मंडळात १०० मिमी., बाहऱ्हाळी- १०४, मुक्रमाबाद - १०४ (ता. मुखेड) आणि मरखेल १०४, मालेगाव १०४ (ता. देगलूर) मिमी पाऊस झाला. शनिवारी (दि.१९) तरोडा (ता. नांदेड) मध्ये ७१.२५ मिमी, वानोळा (ता. माहूर) ७३.२५ मिमी., दि. १८ रोजी मातुळ (ता. भोकर) ७० तर सिंधी (ता. उमरी) मंडळात ८३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या एका आठवड्यात ४ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात आजवर ९७८.८० मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो १०९.८२ टक्के आहे.