

Former corporator Balasaheb Deshmukh arrested
नांदेड, पुढारी वृत्तसेवा पद निवड व गुत्तेदारीच्या कारणावरून मध्यरात्री आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख याला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नांदेड-मालेगाव रस्त्यावर आमदार बालाजी कल्याणकर यांचे निवासस्थान आहे. मध्यरात्री १.३० वाजता माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख हा यथेच्च मद्यप्राशन करून तेथे पोहोचला. तुम्ही कोणाकोणाला कशी पदे वाटता, रस्त्याची कामे कोणाकोणाला देता हे मला महित आहे. असे म्हणत त्याने उपस्थित कर्मचारी व पोलिसांशी हुज्जत घातली. हा प्रकार समजल्यानंतर आ. कल्याणकर यांनी भाग्यनगर पोलिसांशी संपर्क साधला.
सपोनि महाजन हे आपल्या पथकासमवेत घटनास्थळी धावले. परंतु, मद्याच्या अमलाखाली असलेल्या बाळासाहेब देशमुख यांनी पोलिसांशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी बाळासाहेब देशमुख याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आज (दि.१९) सकाळी त्याला न्यायालयापुढे उभे केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नांदेड शहरातल्या शिवसेना (शिंदे गट) यांच्यामधील कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरु आहेत.