Hearing on the appointment of the Municipal Corporation's Leader of the Opposition to be held again today
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणारी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने स्थापन केलेली लोकन्याय विकास आघाडी ही निवडणूक पश्चात स्थापन झालेली आघाडी असून ही आघाडी म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते समुदखान यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान या प्रकरणावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
नांदेड मनपातील काँग्रेस-वंचितचे गटनेते प्रशांत इंगोले व इतरांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला संभाजीनगर उच्च न्यायायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिका प्रकरणी न्यायालयात महापौर, मनपा आयुक्त, विरोधी पक्षनेता यांना नोटिसा बजावल्या होत्या. २२ जुलैपर्यंत नोटिसांना उत्तर देण्याची मुदत होती. विरोधी पक्षनेते मसुद खान यांनी न्यायालयात उत्तर दाखल करून आपली बाजू मांडली आहे.
लोकन्याय विकास आघाडी ही आघाडी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच स्थापन करण्यात आली होती, असा दावा मसुदखान यांनी केला आहे. मूळ राजकीय पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते, त्या पक्षाच्या मान्यतेबाबत कलम 19-100 मधील तरतुदी लागू होतात. या तरतुदी निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या कोणत्याही युतीला किंवा आघाडीला लागू होत नाहीत.
त्यामुळे, विरोधी पक्षनेत्याच्या मान्यतेसाठी सर्वात मोठा राजकीय पक्ष किंवा युती' असल्याचा दावा करण्यासाठी याचिकाकर्ता निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या आघाडीचा आधार घेऊ शकत नाही. असा दावा करणे हे वैधानिक तरतुदींची रचना आणि उद्देश यांच्याशी विसंगत आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर तथ्यांशी संबंधित अनेक वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यामुळे ही याचिका फेटाळली जावी, असेही उत्तरात नमूद करण्यात या आले आहे.
सर्व निवडून आलेले नगरसेवक आपापल्या मूळ राजकीय पक्षांनी वाटप्प केलेल्या निवडणूक चिन्हांवर लढले आणि त्या राजकीय पक्षांचे उमेदवान म्हणून निवडून आले. कोणत्याह नगरसेवकाने नांदेड लोकन्याय विकास आघाडीच्या नावाने किंवा चिन्हाव निवडणूक लढवली नाही. त्यामुळे याचिकाकर्ता कलम 19-1एए च्या अर्थाअंतर्गत मूळ राजकीय पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही असाही दावा मसुदखान यांनी केल आहे.
दावा टिकणार नाही ...
लोकन्याय विकास आघाडी ही निवडणूक होण्यापूर्वीच स्थापन झाली. काँग्रेस आणि वंचितने एकमेकांविरुद्ध उमेदवारही दिले नाहीत. या आघाडीला विभागीय आयुक्तांनीही मान्यता दिली असून या मान्यतेनंतरच काँग्रेस-वंचितला दोन स्वीकृत सदस्य मिळाले. त्यामुळे मसुदखान यांनी केलेला दावा बिनबुडाचा असून कोर्टासमोर तो टिकणार नाही, असे प्रशांत इंगोले यांनी स्पष्ट केले.