Gutkha seized : कुंटूर येथे गुटखा जप्तीची कारवाई; अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांचा दणका Pudhari Photo
नांदेड

Gutkha seized : कुंटूर येथे गुटखा जप्तीची कारवाई; अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांचा दणका

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची धडक मोहीम; लाखोंचा मुद्देमाल जप्त, अनेकांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Gutkha seizure operation in Kuntur; Police crackdown on illegal business

नायगाव : पुढारी वृत्तसेवा

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून, पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने कुंटूर येथे धडक कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दि. ९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या १५ व्या दिवशी पोलीस उपमहानिरीक्षकांच्या अधिपत्याखालील पथकाने नांदेड जिल्ह्यातील कुंटूर परिसरात सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यास दहा वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याचबरोबर मटका-जुगार प्रकरणी १० इसमांविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या २७ जणांविरोधात २४ गुन्हे दाखल करून १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधातही कारवाई करत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ४६ लाख ११ हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या विशेष मोहिमेदरम्यान शस्त्र अधिनियम व कोटपा कायद्यांतर्गतही कारवाया करण्यात आल्या असून, एकूण ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध कारवायांमधून एकूण ६५ लाख ७१ हजार ४२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती मोबाईल क्रमांक ११५०१००१०० वर फोन अथवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT