Guardian Minister's inspection tour of heavy rain-affected areas
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतपिके, घरदार, जनावरे तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नायगाव शनिवारी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात कहाळा, बरबडा, देगाव, पळसगाव कुंचेली, रातोळी, गडगा, मांजरम, कोलंबी आदी गावांना भेट देण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या शेतपिकांबरोबरच राहत्या घरांचे, जनावरांचे व इतर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले.
या दौऱ्यात भाजपचे डॉ. संतुक हंबर्डे, बालाजी बचेवार, तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख, बालाजी मदेवाड, माणिक लोहगावे, मनोहर पवार, राहुल शिंदे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांकडे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, या मागणीचे निवेदन दोन्ही तालुकाध्यक्ष व स्थानिकांच्या वतीने सादर करण्यात आले. पालकमंत्री सावे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या, भाजप यूवा मोचनि तालुक्यातील मांजरम येथील तळ्याची पाळू फुटून झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपत्तीग्रस्त शेतक-यांना दिलासा दिला. ते म्हणाले, प्रशासन गंभीरतेने नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत आहे. पंचनामे पूर्ण होताच नुकसानीचा योग्य मोबदला, मदत तातडीने पोहोचवली जाईल.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने पालकमंत्री अतुल सावे यांना मांजरम परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली व तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख, धनंजय पाटील जाधव, राम पाटील शिंदे, देवानंद शिंदे, आशुतोष मालीपाटील, गोविंद जाधव, श्याम आलेवाड, अमोल शिंदे व गावातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
शनिवारी सकाळी ८.३० च्या दरम्यान वझरगा येथील मारोती हनमंत कोकणे हे मन्याड नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात टाकळी खु. येथून वाहून गेला होता. मात्र झाडाचा सहारा मिळाल्याने झाडाचा आश्रय घेवून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कांती डोंबे यांना मिळाली. त्यांनी तातडीने बोट पाठवून पुराच्या पाण्यात झाडावर आश्रय घेतलेल्या नागरीकास सुखरूप बाहेर काढले. कांती डोंबे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.