Gortha Bridge Nanded 
नांदेड

Nanded news: गोरठा पुलासाठी अखेर PWD ला जाग; 8 दिवसात पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन

शालेय विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना प्रवास करताना तारेवरची पसरत करावी लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र येरावार

उमरी : मौजे गोरठा ते पळसगाव जाणाऱ्या रस्त्यावरील प्रलंबित पुलाच्या कामासाठी श्रीपत पाटील सांळुके यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची बातमी दैनिक पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे.

उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग, उमरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, ग्रामा-33 सा.क्र. 0/800 वरील गोरठा गावाजवळील लहान पुलाचे काम मे. गार्गी डेव्हलपर्स, नांदेड या ठेकेदाराला दि. 28.09.2024 रोजी देण्यात आले आहे. पुलाचे काम चालू असताना पर्यायी वाहतूक रस्ता (Diversion) सुस्थितीत ठेवण्याच्या वारंवार सूचना देऊनही ठेकेदाराने दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तर निधी अभावी शासनाने या कामाला डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

गुरूवारी (दि. 20) प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून ठेकेदाराचे प्रतिनिधी दिगंबर कदम यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ठेकेदाराने 8 दिवसात खडी व मुरूम टाकून पर्यायी रस्ता वाहतुकीस योग्य व सुरक्षित करण्याचे मान्य केले असून, पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीपत सांळुके यांनी जाहीर केलेला उपोषणाचा इशारा मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन PWD ने एका पत्राद्वारे केले आहे. दरम्यान या पत्राच्या प्रती कार्यकारी अभियंता भोकर, तहसीलदार उमरी व पोलीस निरीक्षक उमरी यांना देण्यात आल्या आहेत.

दैनिक पुढारीची दखल...

दोन वर्षापासून पुलाचे काम रखडल्याने या मार्गावर बस सेवा बंद झाली. त्यामुळे शालेय विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना प्रवास करताना तारेवरची पसरत करावी लागत आहे. या संदर्भात दैनिक पुढारीने वेळोवेळी बातमी प्रसिद्ध केली आणि त्या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर जाग आली. दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळेच न्याय मिळाला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमरी तालुका अध्यक्ष श्रीपत साळुंके यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT