Nanded Rain : नांदेड, कंधार, लोहा वगळता जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस file photo
नांदेड

Nanded Rain : नांदेड, कंधार, लोहा वगळता जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस

गुरुपौर्णिमेला पाऊस पडल्याने जिल्ह्यात आल्हाददायक वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Good rainfall across the district, except in Nanded, Kandhar, and Loha

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी व बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. नांदेडसह लोहा व कंधार तालुक्यात कमी तर उर्वरित तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्हाभरात आल्हाददायक वातावरण तयार झाले असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीकामांना गती देण्यासाठी हा पाऊस पुरेसा असला तरी विहिरी-धरणे भरण्यासाठी मुसळधार पावसाची नितांत गरज आहे.

जुलै महिन्यात २८ तारखेपर्यंत पावसाने जिल्ह्यात अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. जूनमध्ये झालेल्या थोड्याफार पावसानंतर जिल्ह्यात पेरण्या झाल्या. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. पण दोन तीन दिवसात पडलेल्या थोड्याफार पावसाने पिकांना आधार मिळाला. जिल्ह्यात मंगळवारी हलका पाऊस झाला. रात्रभर रिपरिप होती. बुधवारी दुपारपासूनच हलक्या सरींना सुरुवात झाली. चारनंतर पावसाने जोर धरला. वृत्त लिहीपर्यंत चांगला पाऊस सुरू होता.

नांदेड जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने मंगळवारी हजेरी लावली. माहूर आणि लोहा तालुक्यातही अर्धा ते एक तास पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात सरासरी ८९१.३० मिलीमीटर पर्जन्यमान आहे. तर एक जूनपासून आजवर ३८३.९० मिलीमीटर पाऊस पडत असतो. पण मंगळवारपर्यंत प्रत्यक्षात २६५ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर मंगळवारी जिल्ह्यात सरासरी २४.५० मिलीमीटर पाऊस पडला.

नायगाव तालुक्यात मंगळवारी सर्वात कमी म्हणजे ३.५ मिमी तर हदगाव तालुक्यात सर्वाधिक २० मिलीमीटर पाऊस पडला. या हलक्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी पिकांसाठी अद्याप चांगल्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नांदेड शहरात मंगळवारी सायंकाळी हलका पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. शहरातील काबरानगर, वजिराबाद, भाग्यनगर, जुनामोंढा, श्रीनगर, कौठा संततधार सुरु होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चांगला पाऊस पडल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

बुधवारची तालुकानिहाय पावसाची आकडेवारी

नांदेड - ८.८० मिमी, बिलोली- २६.४० मिमी, मुखेड- ३०.९० मिमी, कंधार - ७.७० मिमी, लोहा- २.७० मिमी, हदगाव- ११.५० मिमी, भोकर - २७.४० मिमी, देगलूर-४२.४० मिमी, किनवट- ४८.८० मिमी, मुदखेड - २३.७० मिमी, हिमायतनगर-१७.८० मिमी, माहूर - २९.८० मिमी, धर्माबाद - ३९.६० मिमी, उमरी २६ मिमी, अर्धापूर- १७.७०, नायगाव - ३१.५० मिमी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT