Godhamgaon-Ancholi bridge washed away in heavy rain
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील गोधमगाव आंचोली रस्त्यावरील पूल ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, गावकऱ्यांना तब्बल वीस किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून नागरिकांमध्ये संताप आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सासुरवाडीकडे जाणारा असूनही दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
पूल व रस्ता बंद झाल्याने शेतमाल वेळेत बाजारात पोहोचत नाही, शाळकरी विद्यार्थ्यांना व दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती होते. वीस किमी वळसा घालून प्रवास करावा लागतो, हा अन्याय आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर यांनी आंचोली दौऱ्यात रस्त्याची पाहणी केली. त्यांनी एका छोट्या गुत्तेदाराला तात्पुरती दुरुस्ती करण्यास सांगितली, मात्र माती टाकून केलेला रस्ता पावसात पुन्हा चिखलात बदलला आणि प्रयत्न फोल ठरले.
निवडणूक आली की जवळीकता दाखवणारे सगे, सोयरे, धायरे आता का लक्ष का देत नाहीत? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आंचोलीकर यांचे सोयरे असलेल्या नायगावकर, चव्हाण परिवार व खासदार रवींद्र चव्हाण यांचे ही आंचोलीकर जवळचे नातेवाईक आहेत.
पण या दुरुस्तीसाठी कोणीच प्रयत्न करीत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत न केल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हा रस्ता आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सासुरवाडीकडे जाणारा असून, २० दिवस उलटूनही दुरुस्ती झाली नाही. सत्ताधारी पक्षातील आ. राजेश पवार आणि आ. चिखलीकर यांच्या सत्ता कार्यकाळातही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थ प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. चिखलीकर आमदारांच्या सासुरवाडीतच अशी अवस्था असेल, तर सामान्य गावांचा विचार करणे कठीण आहे, अशी टीका ग्रामस्थांनी केली.